मांत्रिकाने मंतरलेलं तेल पाजल्याने महिलेचा मृत्यू, अंधश्रद्धेचा कळस! कोपरगावात गुन्हा
शहर पोलीस स्टेशन परिसरातील खडकी प्रभागातील एका महिलेचा अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मांत्रिक चर्च फादरविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मांत्रिकाने मंतरलेले तेल पाजल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वनिता विश्वनाथ हरकळ (वय 42, रा. खडकी, ता. कोपरगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. भाऊ संजय जीवन पंढरे (वय 49, रा. काळेवस्ती, खडकी. सध्या रा. खेड शिवापूर, पुणे) यांनी फिर्याद दिली. समतानगर चर्चचे फादर चंद्रशेखर गौडा (रा. बागुल वस्ती, कोपरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे.
वनिता यांना कावीळ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर समतानगर चर्चचे फादर मांत्रिक चंद्रशेखर गौडा याने वनिता यांना बाहेरचे काहीतरी झाले आहे. ती औषधाने बरी होणार नाही. तिला मंत्र मारून तेल देतो. ते तुम्ही तीन-चार दिवस प्यायल्या द्या, त्यानंतर ती बरी होईल. यासाठी कुठे दवाखान्यात जाण्याची गरज नाही, असे सांगत त्यांच्याकडील तेलाची बाटली काढून त्यावर हात ठेवून काहीतरी जादूटोणा, मंत्र मारून, हातातील पाणी बाटलीवर शिंपडून त्या बाटलीतील तेल कपाळाला लावण्यास सांगितले. तसेच त्रास होईल तेव्हा बाटलीतील तेल पिण्यासही सांगितले. त्याप्रमाणे वनिता हिने त्या बाटलीतील तेल प्यायले. त्यानंतर तिची तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला लोणी प्रवरा रुग्णालयात दाखल केले. दोन-तीन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला, असे वनिता यांचे भाऊ संजय पंढरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
मांत्रिक गौडा याच्या बेजबाबदारपणाच्या कृत्यामुळे बहिणीचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले असून, पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कोपरगावचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List