22 तासांत एक लाख भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
राज्याच्या कानाकोपऱयातून निघालेल्या दिंडय़ा अन् पालख्यांचा सोहळा सोलापूर जिह्याच्या वेशीवर विसावला असून, पंढरीनगरी वारकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेली आहे. चंद्रभागा नदीचे स्नान करून भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. देवाची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे. एका मिनिटामध्ये 30 भाविकांना पदस्पर्श दर्शन दिले जात असल्याने दिवसभरात 40 हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन आणि 60 हजार भाविकांना मुखदर्शन, असा एक लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळतो आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने, पंढरपूरमध्ये वारकऱयांची गर्दी वाढू लागली आहे. मठ, धर्मशाळा, भक्त निवास आणि हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत. शहरातील मोकळी मैदाने, भक्तीसागर, वाळवंट आदी परिसरात भाविकांनी आपल्या मुक्कामाची सोय केली असून, शासनाच्या वतीने शहराच्या विविध भागामध्ये तात्पुरते शेड उभे करून वारकऱयांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकऱयांना मूलभूत सेवा-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरीत तळ ठोकून आहेत. गेल्या महिनाभरापासून वारीचे नियोजन सुरू आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, निवारा, कायदा-सुव्यवस्था, शौचालये, रस्ते, दर्शन व्यवस्था, स्नान व्यवस्था आदींवर अधिक भर देण्यात आला आहे. पालखी सोहळ्यातील गर्दी पाहता या वेळी वारी विक्रमी भरेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List