पन्हाळा किल्ल्यावर आनंदोत्सव
‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणारे राज्यातील 11 किल्ले आणि तामीळनाडूतील एक किल्ल्याचा समावेश केला आहे. या यादीत कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याचा समावेश असल्याने आज किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा, राज्य आणि देशासाठी ही अभिमानाची बाब असून, जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि गडाचे वैभव सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जागतिक वारसास्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लेझीम व ढोल-ताशा पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस., उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेशासाठी मूल्यांकनासाठी ‘युनेस्को’च्या शिष्टमंडळाने पन्हाळा किल्ल्याची पाहणी केली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांसह ‘युनेस्को’च्या पथकाने किल्ल्याची पाहणी केली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली.
दरम्यान, वीर शिवा काशिद यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अतुलनीय असून, पन्हाळगडावरील त्यांच्या स्मारक परिसराच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List