फडणवीस सरकार मौजमजेत रममाण, राज्यातील आरोग्य सेवेचे धिंडवडे; रुग्णवाहिका न आल्याने महिलेची रस्त्यातच प्रसूती
108 क्रमांकाला फोन करा, एका मिनिटात रुग्णवाहिका तुमच्या दारात हजर होईल! मौजमजेत रममाण असणाऱ्या फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत. वारंवार फोन करूनही रुग्णवाहिका न आल्याने अडलेल्या गर्भवतीला घेऊन नातलगांनी रिक्षातून दवाखाना गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रसूतीकळा असह्य झाल्याने गर्भवतीने रस्त्याच्या कडेला शेतात बाळाला जन्म दिला.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या मेथी गावातील अश्विनी नालापले (22) हिला सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. नातलगांनी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली. बराच वेळ वाट पाहूनही रुग्णवाहिका न आल्याने नातलगांनी अश्विनीला रिक्षात बसवले आणि मुखेडचे सरकारी रुग्णालय गाठण्याचे ठरवले. मात्र, होनवडजजवळ अश्विनीला प्रसूतीकळा वाढल्या. त्यामुळे रस्त्याच्या कडेला शेतातच साडीचा आडोसा करण्यात आला. अश्विनीने गोंडस मुलाला जन्म दिला. नाळ तोडण्याची व्यवस्था नसल्यामुळे दुसरी रुग्णवाहिका मागवून बाळ-बाळंतिणीला मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेथी गावापासून येवती आणि होनवडज ही आरोग्य उपकेंद्र जवळ आहेत. परंतु, या ठिकाणी प्रसूतीची सोय नसल्यामुळे मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते.
जळगावातही गर्भवतीची रुग्णवाहिकेअभावी परवड
मे महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील बोरमळी येथेही रुग्णवाहिका न मिळाल्याने अडलेल्या गर्भवतीने रस्त्याच्या कडेला लुगड्याच्या आडोशाने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली होती. रुग्णवाहिकेला फोन करूनही उपयोग झाला नाही. आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर असतानाच महिलेला प्रसूतीकळा असह्य झाल्या. डॉक्टर, नर्सेसना निरोप देऊनही कुणी आले नाही. शेवटी आसपासच्या महिलांनीच लुगड्याचा आडोसा करून महिलेची सुटका केली. या घटनेची खातरजमा करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी सात किमीचा चिखलरस्ता तुडवून महिलेच्या भेटीसाठी पोहोचले होते. मात्र पुढे काय कारवाई झाली हे गुलदस्त्यातच आहे.
हिंगोलीतही रुग्णवाहिका न आल्याने झाला होता विद्यार्थिनीचा मृत्यू
आदिवासी आश्रम शाळेतून हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी फोन करूनही 108 क्रमांकाची रुग्णवाहिका आलीच नाही. त्यामुळे साध्या रुग्णवाहिकेतून स्वाती झाटे या विद्यार्थिनीला रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, उपचाराला उशीर झाल्याने गळफास घेतलेल्या या विद्यार्थिनीचा तडफडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना हिंगोली जिल्ह्यात जून महिन्यात घडली होती. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर या विद्यार्थिनीचा जीव वाचला असता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List