गोंदिया जिल्ह्यात रेती माफियांचा हैदोस, कठोर कारवाई करण्याची नाना पटोले यांची विधानसभेत मागणी
गोंदिया जिल्ह्यात रेती माफियांचा हैदोस सुरु आहे. यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली आहे. याबाबत त्यांनी X वर एक पोस्टही केली आहे.
X वर पोस्ट करत नाना पटोले म्हणाले आहेत की, “घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी ठरलेल्यांपैकी काहींना सहजपणे जवळपास रेती उपलब्ध होते, तर अनेकांना ती मिळवण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागतो. अशा गरिबांना वाहतुकीचा खर्च परवडणं शक्यच नसतं. डेपो पद्धत जरी अस्तित्वात असली, तरीही जवळ आणि लांब रेती मिळवण्याच्या अंतरामुळे मोठा फरक जाणवतो. परिणामी, गरीब लाभार्थ्यावर वाहतुकीचा अतिरिक्त भार पडतो. या परिस्थितीत सरकारने गरीब माणसाच्या या वेदना समजून घेत, त्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नाना पटोले म्हणाले, “याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अर्जुनी गावात, महसूल मंत्र्यांचे नाव पुढे करून काहीजण खाजगी जमिनीवर रेती उपशाची अधिकृत परवानगी घेऊन थेट नदीतून वाळू उपसत आहेत. ही बाब गंभीर आहे. मूठभर रेती माफियांना लाभ होईल अशा पद्धतीने धोरण राबवले जात आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. परिणामी गरीब लाभार्थ्यांना आवश्यक ती रेती मिळतच नाही. ही वस्तुस्थिती आहे.”
ते पुढे म्हणाले की, “यामुळे या धोरणात तात्काळ बदल करून पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करणे गरजेचे आहे. गरिबाच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्याच्या वेदनांची दखल घेतली पाहिजे आणि या रेती माफियांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List