अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचे रॅकेट; सोलापुरातील तिघांना अटक, दोनशे, पाचशेच्या बनावट नोटांसह प्रिंटर जप्त
बनावट नोटांचा सुळसुळाट सर्वत्र पाहायला मिळत असताना अहिल्यानगरमधील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून, याप्रकरणी सोलापूर येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून बनावट नोटा तसेच प्रिंटरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी सोलापूर जिह्यातील टेंभुर्णी येथेही छापा टाकून 70 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय 33, रा. करमाळा, सोलापूर), राजेंद्र कोंडिबा चौघुले (वय 42, रा. कर्जत, जि. अहिल्यानगर), तात्या विश्वनाथ हजारे (वय 40, रा. पाटेगाव, ता. कर्जत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सोमनाथ घार्गे म्हणाले, अहिल्यानगर जिह्यामध्ये बनावट नोटांचे रॅकेट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे पथकासह राहुरी शहरात पेट्रोलिंग करीत असताना, तीन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाची होंडा शाईन दुचाकी घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने राहुरी शहरात नगर-मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून तिघांना अटक केली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे अनेक साहित्य असल्याचे आढळून आले. यातील आरोपी पवार हा सराईत गुन्हेगार असून, तो टेंभुर्णी या ठिकाणी असतो. चौकशीमध्ये त्याने आम्ही टेंभुर्णी येथे बनावट नोटा छापत असल्याचे सांगितले. नगरच्या पोलीस पथकाने टेंभुर्णीत छापा टाकून तेथून 70 लाखांचे साहित्य जप्त केल्याचे घार्गे यांनी सांगितले. हे आरोपी टेंभुर्णी येथील समाधान गुरव यांच्या इमारतीत भाडय़ाने घर घेऊन रहात होते. आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सूरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदीप ठाणगे, सतीश कुऱहाडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदिम शेख यांच्या पथकाने केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List