मंथन – ऐतिहासिक आकाशझेप

मंथन – ऐतिहासिक आकाशझेप

>> प्रा. विजया पंडित

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे लवकरच अॅसिओम स्पेसच्या ‘एस-4’ मिशनद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (आयएसएस) दौरा करणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय अंतराळवीर अंतराळात प्रवास करतोय. ‘अ‍ॅसिओम स्पेस 4’ वर एक प्रयोग मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये अंतराळवीर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि संगणकांशी कसा संवाद साधतात यावर केंद्रित असणार आहे. यामागे इस्रोचा उद्देश अंतराळातील संगणकीय क्रीन वापरामुळे शरीरावर आणि मेंदूवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणे आहे. तसेच भविष्यातील अंतराळवीरांसाठी एक विश्वासार्ह अन्नस्रोत उपलब्ध करून देता यावा यासाठी बीजांकुरणाचा प्रयोगही केला जाणार आहे. भारतासाठी ही मोहीम अनेक अर्थांनी महत्त्वाची आणि अभिमानाची ठरणार आहे.

भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची ‘अॅसिऑम मिशन 4’अंतर्गत स्पेसएसच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून सुरू झालेली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची यात्रा ऐतिहासिक आहे. त्यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय वैमानिक खासगी अंतराळ मोहिमेत सहभागी झाला आहे. ड्रॅगन हे इलान मस्क यांच्या ‘स्पेसएस’ या कंपनीने विकसित केलेले पुनर्वापरायोग्य अंतराळयान आहे. या यानाचा आकार कॅप्सूलसारखा असल्यामुळे याला ड्रॅगन कॅप्सूल म्हणतात. अलीकडेच भारतीय वंशाची अंतराळयात्री सुनीता विल्यम्स आठ महिन्यांनंतर याच ड्रॅगन कॅप्सूलच्या सहाय्याने अंतराळातून पृथ्वीवर परत आली होती. ‘अॅस-4’ ही स्पेसएसची 53 वी ड्रॅगन मोहीम असून 15 वी मानवी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत शुभांशु शुक्ला यांच्या सोबतही कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), मिशन स्पेशालिस्ट स्लावोस उज्नांस्की (पोलंड), मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) हे अन्य तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर सहभागी असणार आहेत.

शुभांशु शुक्ला सुमारे 14 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असतील. ते या मोहिमेत वैमानिकाची भूमिका निभावतील आणि ड्रॅगन कॅप्सूलच्या उड्डाण, डॉकिंग आणि परतीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. त्यांच्या सोबत अमेरिका, हंगेरी आणि पोलंड येथील अंतराळयात्री असतील. ही मोहीम पूर्णत खासगी स्वरूपाची असून ‘अ‍ॅसिऑम स्पेस’ या कंपनीकडून तिचे संचालन केले जात आहे.

या मोहिमेमुळे भारताचा मान आणि गौरव संपूर्ण जगात पुन्हा एकदा उंचावणार आहे. या मोहिमेमुळे 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत संघाच्या सहकार्याने केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासाची आठवण ताजी झाली आहे. राकेश शर्मा हे अंतराळात गेलेले पहिले भारतीय होते. 2023 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान शुभांशु शुक्ला यांची या मोहिमेसाठी घोषणा करण्यात आली. हे मिशन भारत आणि नासामधील सहकार्याचे प्रतीक मानले जात आहे. यासाठी शुभांशु यांनी स्पेसएस व अ‍ॅसिओम स्पेस यांच्याकडून खास प्रशिक्षण घेतले आहे. ‘अ‍ॅस-4’च्या चालक दलाने आणि स्पेसएसच्या तांत्रिक पथकांनी संपूर्ण प्रक्षेपण पूर्वाभ्यास केला आहे. यामध्ये ‘फाल्कन 9’ रॉकेटची स्टॅटिक फायर चाचणीसुद्धा करण्यात आली आहे. शुभांशु हे अत्यंत अनुभवी पायलट असून झुंझार बाण्याचे आहेत.

या मोहिमेसाठी भारत सरकारने सुमारे 548 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये शुभांशु यांची तसेच त्यांच्या बॅकअप अंतराळवीर प्रशांत नायर यांची प्रशिक्षण प्रक्रिया समाविष्ट आहे. या मोहिमेचा मुख्य हेतू म्हणजे, भारताच्या ‘गगनयान’ या स्वदेशी मानवयुक्त अंतराळ मोहिमेपूर्वी प्रत्यक्ष अनुभव मिळवणे, मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये जैविक आणि वैज्ञानिक प्रयोग करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय अंतराळ संशोधनाची प्रतिमा उंचावणे हा आहे. शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) 14 दिवस राहून विविध प्रयोग करावयाचे आहेत. हे प्रयोग जैवतंत्रज्ञान, मानवी आरोग्य, अन्नधान्याचे बीज संवर्धन, पृष्ठभागाविना झोप, स्नायूंचा ऱ्हास आणि मानवी जैविक चक्रांवर होणाऱ्या परिणामांवर आधारित आहेत. विशेष म्हणजे, हे प्रयोग भारतीय संस्थांनीच विकसित केले आहेत आणि यामध्ये भारतीय संशोधनाची मोठी शक्यता आहेत.

या मोहिमेवर होणारा खर्च अनेकांना खूप मोठा वाटू शकतो; परंतु जागतिक स्तरावर मानवयुक्त अंतराळ मोहिमांचा खर्च पाहता ही रक्कम तुलनेने कमी आहे. तसेच या खर्चाचा उपयोग केवळ शास्त्राrय संशोधनापुरता मर्यादित नसून भारताच्या अंतराळ संशोधनाला जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याच्या दृष्टीनेही अत्यंत मोलाचा आहे. या मोहिमेमुळे भारताच्या गगनयान मिशनसाठी आवश्यक अनुभव आणि कौशल्य प्राप्त होणार आहे. भविष्यातील चांद्र मोहिमा आणि मंगळ मोहिमांसाठी हे मिशन फलदायी ठरेल. याशिवाय, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्माण, आरोग्य आणि अन्नधान्य उत्पादन यामधील संशोधन मानवाच्या पुढील पिढय़ांच्या दृष्टीने परिणामकारक ठरणारे आहे. याचप्रमाणे शुभांशू शुक्ला यांनी भारतातल्या विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे विज्ञान क्षेत्रात, खास करून अंतराळ विज्ञान, खगोलशास्त्राच्या क्षेत्रात तरुणांचा ओढा वाढण्यास मदत होईल. शुभांशू यांनी स्वत म्हटले आहे की, ही केवळ माझी नाही, तर 140 कोटी भारतीयांची यात्रा आहे. ही भावना देशभक्ती आणि वैज्ञानिक प्रेरणेचे उत्तम उदाहरण आहे.

शेवटी, अशा प्रकारच्या मोहिमा केवळ प्रतिष्ठेपुरत्या मर्यादित नसतात, तर त्या देशाच्या विज्ञानविषयक स्वावलंबनासाठी आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी अत्यावश्यक असतात. जेव्हा आपण हा खर्च देशाच्या एकूण वार्षिक उत्पन्नाशी तुलना करतो, तेव्हा हा फक्त 0.005 टक्क्यांइतका अल्प भाग ठरतो, पण त्यातून मिळणारी प्रेरणा, संशोधन आणि जागतिक सहकार्याचा फायदा अमूल्य असतो.

शुभांशू शुक्ला अ‍ॅसिओम स्पेसच्या ‘अ‍ॅस-4’ या मोहिमेवर अंतराळात जात असतानाच ‘टार्डिग्रेडस्’ नावाचे सूक्ष्म जीवही अंतराळात पाठवले जाणार आहेत. हे जीव नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत, पण सूक्ष्म असले तरी ते जगातील सर्वात प्रबळ सर्व्हायव्हर्स (टिकून राहणारे जीव) म्हणून ओळखले जातात. जिथे माणूस टिकणे अशक्य आहे, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ते जिवंत राहू शकतात. पाण्याच्या उत्कलन बिंदूपेक्षा अधिक तापमानातही ते मरत नाहीत. ते पृथ्वीवरचे एकमेव असे ज्ञात जीव आहेत, जे अंतराळातील कठोर वातावरणातही जिवंत राहू शकतात. 2007 मध्ये युरोपियन अंतराळ संस्थेने एका रशियन कॅप्सूलमधून तीन हजार टार्डिग्रेडस् दहा दिवसांसाठी अंतराळात पाठवले होते. त्यांना दोन हजार किलोमीटरपेक्षा कमी उंचीवर सोडण्यात आले होते. या मोहिमेनंतर दोन-तृतीयांश टार्डिग्रेडस् जिवंत राहिले आणि पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांनी प्रजननही केले.

शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कंप्युटर सिस्टम आणि डिजिटल डिस्प्लेंचा अभ्यास करणार आहेत. या प्रयोगात डोळे-हात यांच्या समन्वयाने इशारे देण्याची क्षमता तसेच डिजिटल क्रीनशी संबंधित अडचणी आणि प्रतिक्रिया यांचा अभ्यास केला जाईल. यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांमधील संगणकीय इंटरफेस अधिक वापरण्यास सुलभ (युजर-फ्रेंडली) होऊ शकतील.

शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये बीजांकुरण प्रक्रियेचा प्रयोग लक्षवेधी स्वरूपाचा आहे. पृथ्वीवर बीजांकुरणासाठी गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी), पाणी, उष्णता आणि प्रकाश या घटकांची आवश्यकता असते. गुरुत्वाकर्षणामुळे रोपांची मुळे खाली आणि अंकुर पृष्ठभागावर वाढतात, पण अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळ जवळ शून्य असते. त्यामुळे तेथे बियाण्यांचे वर्तन आणि अंकुरणाची प्रक्रिया पूर्णत वेगळी असते. गुरुत्वाकर्षण नसल्याने मुळे आणि अंकुर दिशा ठरवू शकत नाहीत. ती कुठल्याही दिशेने वाढू शकतात. पाण्याचा प्रवाह वेगळा असतो. पाणी खाली साचत नाही. त्यामुळे बीजांना आवश्यक तो ओलावा पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा लागतात. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे बियाण्यांच्या पेशींमध्ये काही जैविक वर्तनबदल होतात. वाढीचा वेग, हार्मोन्सचे प्रमाण यामध्ये होणारे हे बदल सूक्ष्म स्वरूपाचे असले तरी त्यांच्या अभ्यासातून नवे आकलन होते. आधुनिक मानवी समूह भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ वस्ती प्रकल्पांचे नियोजन करत आहे. त्यामध्ये अन्न उपलब्धतेसाठी बियाण्यांची लागवड आवश्यक ठरणार आहे. त्या दृष्टीने अंतराळातील शेतीसाठी कोणती बीज प्रजाती उपयुक्त ठरेल याचा शोध या मोहिमांमधून घेतला जात आहे. तसेच शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत वनस्पतींच्या पौष्टिकतेवर, वाढीवर आणि प्रतिकारशक्तीवर काय परिणाम होतो, याचाही अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे. भविष्यातील जागतिक अन्न सुरक्षेचा आधार म्हणून या सर्वांचे मोल अनन्यसाधारण आहे. शुभांशू शुक्ला यांच्या मोहिमेद्वारे असे प्रयोग होणे ही भारतासाठी सुसंधी आहे. त्यांची अंतराळ यात्रा ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर
तुम्ही सोशल मीडिया आणि अनेक सेलिब्रिटींना असे म्हणताना ऐकले असेल की रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते....
Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!
IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या
केरळच्या मुख्यमंत्री निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची मिळाली धमकी, पोलीस अलर्ट मोडवर