Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
अमरनाथ यात्रेला चाललेल्या अनेक बस एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघाताची घटना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातात 10 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.
कुलगामच्या खुदवानी भागात ताचलू क्रॉसिंगजवळ रविवारी हा अपघात घडला. भाविकांच्या बसेस बालटालकडे जात असतानाच एकमेकांवर धडकल्या. सुदैवाने जखमी झालेल्या कोणत्याही भाविकांना गंभीर दुखापत झालेली नाही. अनेक बसेसच्या पुढील काचा फुटल्या. जखमी प्रवाशांना रुग्णालयात पाठवण्यात आले आणि उर्वरित प्रवाशांना इतर वाहनांमध्ये हलवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच कुलगाम पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कशामुळे घडला याबाबत चौकशी सुरू केली. याआधी 5 जुलै रोजी देखील अमरनाथ यात्रेला चाललेल्या तीन बसेसची टक्कर झाली होती. या अपघातात 36 भाविक जखमी झाले होते. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List