झोप उडाली; कुणाशी बोलतही नाही, फक्त एकटक… अहमदाबाद दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशासोबत नेमकं काय घडतंय?
अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया ड्रीमलायनर विमान दुर्घटनेतून विश्वास कुमार रमेश हा एक प्रवासी बचावला. एवढ्या मोठ्या विमान दुर्घटनेतून बचावल्याने त्याला जगातील भाग्यवान व्यक्ती असे म्हटले जात असले तरी सध्या त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे समोर आले आहे. मृत्युचे तांडव डोळ्यासमोर पाहिल्याने त्याची विश्वासची झोप उडाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तो मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेत असल्याचे विश्वासच्या चुलत भावाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात एअर इंडियाचे बोईँग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले होते. या विमान दुर्घटनेतून हिंदुस्थानी वंशाचा ब्रिटीश नागरिक विश्वास हा वाचला, मात्र त्याचा भाऊ अजय याच्यासह विमानातील 241 प्रवाशांचा आणि ज्या ठिकाणी विमान कोसळले तिथल्या 19 ते 20 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून वाचल्यानंतर विश्वासची मानसिक स्थिती खालावली आहे.
विश्वासच्या चुलत भावाने त्याच्या मानसिक स्थितीबाबत बोलताना सांगितले की, तो अजूनही या दुर्घटनेतून सावरलेला नाही. ही घटना त्याला अस्वस्थ करत आहे. या भीषण दुर्घटनेतून वाचणे आणि भावाच्या मृत्युचा त्याला धक्का बसला आहे. तो ब्रिटीश नागरीक असून विदेशात राहणारे अनेक नातेवाईक त्याच्याशी फोनवर संवाद साधतात. त्याची काळजीही करतात. पण विश्वास सहसा कुणाशी बोलत नाही. तो अजूनही यातून सावरलेला नाही.
दुर्घटनास्थळाची दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येतात. त्यामुळे तो अचानक झोपेतून डचकून उठतो. मग त्याला पुन्हा झोपच लागत नाही. सतत त्याच घटनांची त्याला आठवण येते. तो एकटाच अंथरूणात बसून असतो, एकटक कुठेतरी बघत असतो. त्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात आले. सध्या तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे लंडनला परत जाण्याचाही तो विचार करत नाहीय. त्याचे पुन्हा विमानात बसण्याचे धाडस होत नाहीय, असेही त्याने सांगितले. ‘मिंट‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
इंधन पुरवठा बंद झाल्यानेच 34 सेकंदांत विमान कोसळले, अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल समोर
उपचारानंतर सुट्टी
दरम्यान, विमान दुर्घटनेतून वाचल्यानंतर विश्वासवर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याची भेट घेतली होती. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने त्याच्या भावाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती आणखी ढासळत गेली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List