Jalna News – टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, शेतमजुर मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू
टेम्पो आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघातात शेतमजुर मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथे केजहून शेती कामासाठी एका टेम्पोमधून काही मजूर जात होते. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास जालना ते वडीगोद्री मार्गावरील सुखापुरी फाट्याजवळ खाजगी बस मिनी बसला मजुरांच्या टेम्पोची धडक बसली. या अपघातात टेम्पोमधील अंजना पुरुषोत्तम सापनर (30) आणि अनुसया पुरुषोत्तम सापनर (14) या मायलेकीचा मृत्यू झाला. तर पुरुषोत्तम नाथराव सापनर (40), कृष्णा पुरुषोत्तम सापनर (16), बाळू शेळके (35), सतीश लबडे (35) हे किरकोळ जखमी आहेत.
खाजगी बसमधील विजय नेहारकर, रामचंद्र फड, संदीप उमाजी शेप आणि यश फुलारे हे जखमी झाले आहेत. जखमींना अंबड उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर जालना येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मायलेकीच्या मृत्यूमुळे सापनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताबाबत दोन्ही वाहन चालकांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List