Mukul Dev death: ‘सन ऑफ सरदार’ सिनेमातील अभिनेता मुकूल देवचे वयाच्या 54व्या वर्षी निधन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मुकुल देवचे निधन झाले आहे. 24 मे रोजी, वयाच्या ५४व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. मुकूलच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याने ‘आर… राजकुमार’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जय हो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मुकुल देवचा जन्म १७ सप्टेंबर १९७० रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील हरि देव हे दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त होते, ज्यांचे २०१९ मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. मुकुलचा भाऊ राहुल देव हा देखील एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आहे. मुकुलने दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतून वैमानिक प्रशिक्षण घेतले होते. तो एक प्रशिक्षित पायलट होता ही बाब फारच कमी लोकांना माहिती आहे.
सिनेमांमधील कारकीर्द
मुकुलने १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या दूरदर्शन मालिकेत काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्याने ‘दस्तक’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सुष्मिता सेन दिसली होती. त्याच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये ‘वजूद’ (१९९८), ‘कोहराम’ (१९९९), ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’ (२००१), ‘यमला पगला दीवाना’ (२०११), ‘सन ऑफ सरदार’ (२०१२), ‘आर… राजकुमार’ (२०१३) आणि ‘जय हो’ (२०१४) यांचा समावेश आहे. त्याने हिंदी, पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले.
वाचा: पाकिस्तानमधून पळून आला अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आता ऑपरशेन सिंदूरचं केलं कौतुक
मालिकांमध्येही काम
मुकुलने ‘कहीं दिया जले कहीं जिया’ (२००१), ‘कहानी घर घर की’ (२००३), ‘प्यार जिंदगी है’ (२००३) यांसारख्या मालिकांमधून छोट्या पडद्यावरही आपली छाप पाडली. याशिवाय, त्याने ‘फिअर फॅक्टर इंडिया’च्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन केले आणि ‘कभी कभी प्यार कभी कभी यार’ (२००८) या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. २०१८ मध्ये त्याने ‘ओमेर्ता’ या चित्रपटासाठी लेखक म्हणूनही योगदान दिले. मुकुल देवला ‘यमला पगला दीवाना’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी ७वा अमरीश पुरी पुरस्कार मिळाला होता. त्याच्या खलनायकी आणि सहाय्यक भूमिकांनी प्रेक्षक व समीक्षकांची पसंती मिळवली होती.
शेवटचा प्रवास
मुकुल देवच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्याच्या पश्चात भाऊ राहुल देव आणि कुटुंब आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List