अनुबंध- आवाज ही आवाज हैं

अनुबंध- आवाज ही आवाज हैं

>> विश्वास वसेकर

काही सुरावटी आपल्या स्मरणरंजनात अढळ स्थान मिळवतात अन् आपण मौनाच्या समाधीचा अनुभव घेतो. ही आवाजाची दुनिया जगातले सारे सुख पदरात टाकते, पण ते वेचण्याचे सौभाग्य आपल्या गाठी असावे लागते. वेचलेले हे अनुभव… हे सौभाग्य…सगळेच मोहमयी आहे.

पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यानात पोहोचायला त्या दिवशी थोडा उशीरच झाला होता. नाथसागरावरील पक्ष्यांनी थोडा जास्त वेळ घेतल्यामुळे असेल कदाचित. ज्ञानेश्वर उद्यान गाठेपर्यंत संध्याकाळच होत आली. भराभर डोळ्यांच्या कॅमेऱयाने दिसेल ते टिपत आणि साठवत असताना चक्क अंधारच पडला. ज्ञानेंद्रियांची त्र्याऐंशी टक्के कामं बंद पडली आणि उर्वरित सतरा टक्क्यांवर अवधान विसावलं. ज्या टोकाला आम्ही होतो त्याच्या विरुद्ध दिशेने सुरांची मधुर आलापी सळसळत आमच्या दिशेने आली. अमृताच्या कुंभाकडून कुंडलिनी सोलीव सुखाने चिंब होऊन जणू आमच्या दिशेने झेपावत होती. मी स्तिमित झालो.

‘घनु वाजे घुणघुणा’च्या आधीची ती आलापी मी पहिल्यांदाच ऐकत नव्हतो. मात्र त्या दिवशी सुरावटींचा माझ्यावर जो परिणाम झाला तितका तीव्रोत्कट कधीच झाला नव्हता. नेहमीच्या पाहण्यातलं असलं तरी कंटाळा न येणारं एखादं सौंदर्य लग्नात एकदम उंचीच्या वस्त्रालंकारादींनी नटून-थटून समोर यावं आणि आपण नादावून त्याच्याकडे नुसतं पाहातच राहावं तसं झालं! आधी अंगावर सरसरून रोमांच आले आणि शेवटी न कळत आनंदाश्रू! लता मंगेशकर या नावाने उपाधियुक्त झालेले, दिव्य, स्वर्गीय शब्दब्रह्म अनुभवताना कानाला जिभा फुटणं ही ज्ञानेश्वरांची प्रतिमाही आकळली.

गाण्यावर जेवढं पराकोटीचं प्रेम केलं तेवढं माणसावरही केलं नाही. पुष्कळदा गमतीने म्हणत असतो की, या जगात विनोद आणि गाणं या दोन गोष्टी नसत्या तर आपण एक क्षणभरही थांबलो नसतो. या जगात महंमद रफी, किशोरकुमार, लता, आशा भोसले, मेंहदी हसन, रूना लैला, मुन्नी बेगम, गुलाम अली असे सूर निनादताहेत. त्याने जगणं केवढं मोहमयी आणि सुंदर झालंय याची जाणीव करून घ्यायची असेल तर यांना वगळून जगण्याची कल्पना करून पाहा. छे, अशी तर कल्पनाही करवत नाही.

एकदा मी चारचाकी विकत घेतली आणि तिच्यात साडेसात हजाराचा सुंदर टेपरेकॉर्डर बसवून निवांत व मनमुराद गाणी ऐकली. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात भाग्यवंत आणि सुंदर दिवस! आबिदा या गायिकेने गायिलेला ‘फैज अहमद फैज’ आणि हरिहरनच्या गझला त्या दिवशी मी ऐकल्याचं अजून आठवतं. त्या क्षणी साथ करायला पुन्हा कविताच होती, जी मला पुढच्या महान सौख्याचं आश्वासन देत होती.

मी रोमँटिसिझम मानणारा असल्यामुळे स्मरणरंजनाचं मला वावडं नाही. नगरात पहिला दीपा निसळ स्मृती पुरस्कार घ्यायला गेलो आणि खरा आनंद तिथे मिळाला मुकुंद फणसळकर, अपर्णा संत यांच्या ‘नॉस्टेल्जिया’ या कार्यक्रमात. आपला केवढा रम्य भूतकाळ या जुन्या गाण्यांत गुरफटला आहे हे त्या रात्री प्रकर्षाने जाणवलं. आपण वाढत होतो, पोसले जात होतो ते या गाण्यांवरच. सगळ्या वाटेवर आणि वळणावर ही गाणी उभी आहेत. काही गाणी आपल्याला पूर्वी एवढी आवडली नव्हती, पण अमुक प्रिय व्यक्तीने ते म्हटलं आणि तेव्हापासून ते आपलं आवडतं गाणं झालं असंही होतं. ‘गीतयात्री’ आणि ‘गीतमुद्रा’सारखी पुस्तकं आपली गीता, बायबल का होतात? तर या लेखकांच्या, आपल्या नॉस्टेल्जियात असणाऱया साधर्म्यामुळे!

माझ्या आधीच्या पिढीच्या लहानपणी ‘रेडिओ’ नावाची जादूची पेटी नव्हती. आपण किती योग्यवेळी जन्म घेतला असं कधी कधी वाटतं. नाही? रेडिओवर ऐकलेले ‘भूले बिसरे गीत’,  ‘पुरानी फिल्मों का संगीत’, ‘झरोखा’, ‘बिनाका गीतमाला’, ‘जयमाला’ हे गाण्यांचे कार्यक्रम अजूनही विसरता येत नाहीत. कारण त्यांनीच तर ते दिवस ‘इंद्रदिन’ केलेत.

काही सुरावटी आपल्या स्मरणरंजनात अढळ स्थान मिळवतात. परभणीच्या रघुवीर टॉकीजमध्ये शो सुरू होण्याआधी मोठय़ा आवाजात गाणी लागत आणि शेवटी ‘कम सप्टेंबर’ची ती प्रसिद्ध धून वाजवली जायची. ती धून वाजणं म्हणजे सिनेमा सुरू! उन्हाळ्यात गच्चीवर अभ्यास करणारे आम्ही रोज रात्री साडेनऊला ‘कम सप्टेंबर’ची ती धून जिवाचा कान करून ऐकायचो.

रेडिओवर सकाळी पावणेसहाला सकाळचे प्रसारण सुरू होताना पन्नालाल घोषच्या बासरीची एक धून वाजायची. इतकी गोड की झोप फेकून देऊन उठून बसावं. असं वाटायचं की, ही धून वाजली नाही तर सूर्यच उगवायचा नाही, फुलंच उमलायची नाहीत. ‘आविष्कार’ नावाच्या सिनेमात सकाळ झाली हे सूचित करण्यासाठी आकाशवाणी वरची ती संपूर्ण धून वाजवली होती. ती ऐकताना वाटलं, आता पक्षी किलबिल करणार, फुलं उमलणार, सूर्यकिरणं पसरणार आणि एखादा कोंबडाही आरवणार!

सुंदर आवाजांची दुनिया कर्णकटू आवाजाखाली दबली जाते अशी सारखी भीती वाटते. मध्यंतरी मोबाइलमुळे चिमण्या कमी होताहेत असं वाचून केवढा घाबरलो होतो. मोबाइलचा आवाज माझा नावडता आवाज, त्यामुळेही असेल. माझा मोबाइल वाजला की, मला दुसऱयांची तंद्री, समाधी किंवा प्रायव्हसी आपण भंग करत आहोत असं वाटतं. यावर उपाय म्हणून मी माझ्या मोबाइलला पक्ष्यांच्या चिवचिवाटाची रिंगटोन करून घेतली. मला आणि आजूबाजूच्यांना काल आल्याचं आता कळतच नाही. खरंच चिमण्या चिवचिवत आहेत असं वाटतं. आवडते आवाज कानी पडावेत यासाठी असा जीव टाकावा लागतो. बासरी, बीन, ढोलकी, तबला, ओढय़ाची खळखळ, वेळूच्या बनातली शीळ, पावसाचे निरनिराळ्या पार्थिवावर कोसळतानाचे सगळेच आवाज सुंदर असतात.

एकदा रेडिओवर व्यंकटेश माडगूळकरांनी सादर केलेलं मोराबद्दलचं रूपक ऐकलं आणि मी केका ऐकण्याचा ध्यासच घेतला. पावसाळ्यात पुणे गाठलं आणि संभाजी उद्यानात मोराच्या दारात धरणं धरून बसलो. तो मोरही बेटा चावटच होता. मी का आलोय हे कळल्यासारखा मौनाच्या समाधीतून बाहेर येईचना. मीही जिद्दीला पेटलो. पावसाळा आहे, आकाशात कृष्णमेघ आहेत अन् हा थोबाडाला कुलूप लावून बसतो याला काय अर्थ आहे? चार-साडेचार तास तंगाडत बसवलं. नंतर मात्र इतका सुंदर केका काढायला लागला की व्वा!

त्यानंतर एक पूर्ण दिवाळी बीड जिह्यातल्या डोमरी इथल्या सोनदरा गुरुकुलात साजरी केली. ठेचा-भाकरी खाऊन. रोज सकाळी उठायचं आणि शेकडो मोरांत नाचायचं. त्या वेळी हेही कळलं की, मोरांची केकावली फक्त पावसाळ्यातच अवतरते असं काही नाही.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन? Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन?
मिनी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटा आताच मैदानात उतरला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे...
या अभिनेत्रीने केली पहलगामच्या तुरुंगात शूटिंग; खऱ्या गुन्हेगारांमध्येही वावरली बिनधास्त
सी सेक्शन कंफर्ट; सुनील शेट्टीला लेक अथियाच्या प्रसूतीवर कमेंट करणं पडलं महागात, झाले ट्रोल
मिथुन चक्रवर्ती यांच्या घरावर संकट, BMC कडून नोटीस जारी, काय आहे प्रकरण?
राज्यात दोन दिवस पावसाचे; मुंबईसह ठाणे, रायगडला सतर्कतेचा इशारा
मालाडमधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण – मिथुन चक्रवर्ती यांना BMC ची नोटीस
धोनीचेच फॅन्स खरे, बाकीच्यांचे पेड; हरभजन सिंगचे मोठे विधान