जंगल बुक- काळाकभिन्न

जंगल बुक- काळाकभिन्न

>> अमोल हेंद्रे

युगांडा टुरिझम बोर्डाचा मी गेले काही महिने पाठपुरावा करत होतो. युगांडातल्या बियुंडी नॅशनल पार्क आणि तिथे मुक्त संचार करणाऱया गोरिलाने माझ्या मनावर गारुड केलं होतं. बियुंडीसारखी आफ्रिकेतली जंगलं म्हणजे स्वर्ग आहेत. घनदाट झाडंझुडपं, थरकाप उडवणाऱया नद्यानाले, तलाव, थांगपत्ता लागू न देणाऱया पाऊलवाटा आणि अजस्र जनावरं असा त्या जंगलांचा दरारा आहे. तिथे वावर असलेले जिराफ, झेब्रा, हत्ती, सिंह, साप, अजगर इत्यादी प्राणी आपापल्या परिसराचे राजे आहेत. जंगलात उगीच कोणी कोणाच्या वाटय़ाला जात नाहीत. भूक लागली की, ते आपापले अन्न शोधतात, शिकार करतात. क्षुधाशांती झाली की, गुण्यागोविंदाने नांदतात. त्यांच्या मनात उद्याचा विचार नसतो. त्यामुळे स्वार्थ नसतो. उदरभरण, प्रजोत्पादन आणि स्वरक्षण ही तीन उद्दिष्टे बाळगून ही जनावरं जगत असतात. जीवनविषयक तत्त्वज्ञान अनुभवायचं असेल तर आफ्रिकेतली जंगलं हे उत्तम व्यासपीठ आहे.

बियुंडी नॅशनल पार्क इथे जाण्याची माझी धडपड सुरू होती. युगांडाच्या जंगलप्रेमींशी माझा संवाद सुरू होता, पण हवं तसं यश मिळत नव्हतं.

यादरम्यान मला एकाने लिलीशी ओळख करून दिली. लिली आजारोवा! एक धडाडीची जंगल सेवक. युगांडा शासनातल्या पर्यटन विभागाची प्रमुख. त्या वेळी लिली चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत होती. तिला मी सगळी माहिती ईमेल केली आणि मी युगांडातल्या गोरिलांवर अभ्यास करावा, असा तिने प्रस्ताव मांडला.

मी युगांडा, क्वीन एलिझाबेथ नॅशनल पार्क आणि गोरिला या विषयावर अभ्यास सुरू केला. लिलीने विमानाची तिकिटं, हॉटेल बुकिंग आणि ट्रिपचा संपूर्ण आराखडा पाठवला. युगांडा सरकारने माझा दौरा प्रायोजित केला होता! 21 मे 2024 रोजी भल्या पहाटे आम्ही बियुंडीच्या जंगलात पायउतार झालो. आम्ही एकूण आठ जण वेगवेगळ्या देशांतून आलेले जंगल अभ्यासक होतो. आमच्या सोबत रेंजर (प्राणिमित्र) आणि पोर्टर (पर्यटकांचं सामान उचलणारे हमाल) होते. गोरिला हा प्रेमळ, कुटुंबवत्सल प्राणी आहे. ओळखीच्या, सरावाच्या माणसांशी तो आपुलकीने वागतो. विनाकारण कोणाला त्रास देत नाही. स्थानिक पोर्टर, रेंजर यांना गोरिला ओळखतात. त्यांच्याकडे अधिकृत पिस्तूल असतं. त्यांना इंग्रजी बोलता येतं. गोरिलांशी ते खाणाखुणा करून संवाद साधतात. त्यांच्याकडे बंदूक असली तरी ते कोणत्याही परिस्थितीत जनावरावर फायरिंग करत नाहीत. चुकून कधी गोरिला हिंस्त्र झाला तर त्याला नियंत्रणात आणण्यासाठी रेंजर हवेत गोळीबार करतात. गोरिलाला ठार करणं ही कल्पनाही ते लोक करू शकत नाहीत. तो युगांडाचा राष्ट्रीय प्राणी नसला तरी त्याला तो प्रोटोकॉल दिला जातो. गोरिलामुळे तिकडचं पर्यटन चालतं आणि पर्यटनावर सारा देश चालतो!

जंगलातली पहाट प्रसन्न होती. वातावरण उत्साही होतं. जंगलातल्या ठरावीक अंतरापर्यंत आम्ही मिनी बसने गेलो. पुढचा मोठा पल्ला पायी चालत गाठला. त्याला गोरिला ट्रेक म्हणतात. आम्ही जंगल तुडवत चालू लागलो. तो परिसर गोरिलांचा होता. त्यामुळे इतर प्राण्यांचा धोका नव्हता, पण तिथे पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसत होते. युगांडात सुमारे एक हजाराच्या वर पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. तऱहेतऱहेचे बगळे, बिटरन, सारस, आयबिसेस आम्हाला दिसले. त्यांचा शुबिल हा राष्ट्रीय पक्षी आम्हाला काही दिसला नाही. जंगलाचा जो परिसर गोरिला अधिवासासाठी निवडतात तिथे खूप प्रकारचे पक्षी असतात. याचं कारण गोरिला हा शाकाहारी प्राणी आहे. त्याला झाडं, फुलं, पानं, फळं खायला आवडतात.

गोरिला ट्रेक करत असताना आम्हाला प्रथमदर्शनी दिसलं गोरिलाचं पिल्लू. ते पाहून आमच्या रेंजरने तोंडाने एक प्रकारचा आवाज काढला. आवाज ऐकून तीन गोरिला तिथे आले. ते अवाढव्य होते. तो क्षण थरारक होता. त्यांना पाहून रेंजर आणि पोर्टर पुढे सरसावले. त्यांनी खुणेने आम्हाला गप्प बसायला सांगितले. आमच्यातला एक पोर्टर हुशार होता. आमचे सामान सांभाळत तो दबक्या आवाजात म्हणाला, “कॅमेरा काढा, फोटोग्राफी करा.” एक पिल्लू आणि तीन मोठे गोरिला पाहून आमचं भान हरपून गेलं. दोन माद्या व एक नर होता. काळ्याकुट्ट नराकडे पाहून मला ‘काळाकभिन्न’चा शब्दश अर्थ कळला. त्याचे हात म्हणजेच पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा मजबूत आणि लांबीने मोठे होते. अधूनमधून तो माणसासारखा दोन पायांवर उभा राहत होता. त्यांची उंची साडेपाच-सहा फूट सहज असेल. डोक्याचा आकारही चांगला मोठा होता. त्याला जवळून पाहताना तो महाकाय भासत होता, पण त्याचा चेहरा प्रेमळ आणि डोळ्यांतले भाव आपुलकीचे होते. त्या कुटुंबातली एक मादी झाडावर चढून करवंदांसारखी लाल, हिरवी फळं काढून खात होती. ते इतरांना दाखवत होती. बहुधा तिला वाटत असावं की, छोटय़ा पिल्लाने फळांचा रस चाखावा, पण त्या पठ्ठय़ाला तिची फिकर नव्हती. तो जमिनीवरचं गवत उपटून इकडे तिकडे फेकण्यात बिझी होता. हे सारं जंगलनाटय़ आम्ही झाडाआडून पाहत होतो, डोळ्यांत साठवून ठेवत होतो. माझा कॅमेरा खचाखच फोटो खेचत होता. पुढच्या तासाभरात मी एक हजारहून जास्त फोटो खेचले. गोरिलासारखी लोप पावत चाललेली प्रजाती आठ-दहा फुटांवरून पाहायला मिळणं म्हणजे पर्वणीच. आमच्यापैकी प्रत्येकाने या ट्रेकसाठी 850 डॉलर्स मोजले होते. हा दर तिकडच्या शासनाने ठरवलेला आहे. या निधीतून ते जंगल आणि त्यातल्या गोरिलांचं संवर्धन युद्धपातळीवर करतात. माझा संपूर्ण खर्च लिली आजारोवाने युगांडा टुरिझमच्या वतीने केला. अशा प्रकारचा सन्मान मिळवणारा मी एकमेव भारतीय आहे या विचाराने माझी छाती गोरिलाच्या छातीपेक्षा मोठी झाली.

आम्ही सुमारे अर्धा दिवस गोरिलांच्या सान्निध्यात घालवला. त्यांच्या विश्वात मग्न असलेल्या त्या चार गोरिलांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. गोरिला प्रजाती पाणी कमी पितात. त्यांना पाण्याचे भय वाटते. त्यांना जगायला लागणारे पाणी ते फळाफुलांमधून शोषतात. त्यांना पोहता येत नाही. त्यामुळे पाण्यापासून ते चार हात दूर राहतात. जंगलातून परत फिरताना रेंजर म्हणाला, “नेहमी लक्षात ठेवा. आपण जंगलाचे पाहुणे आहोत. आपण जंगलांचा आस्वाद जरूर घ्यावा, पण त्यांच्या अधिवासाचा अनादर कधी करू नये.”

आम्ही जंगलातून माघारी फिरलो. कॅमेऱयात पकडलेले क्षण कधी एकदा लॅपटॉपवर पाहतो असं झालं होतं. परतीच्या प्रवासात रेंजर म्हणाला, “रवांडा हा आमच्या युगांडाशेजारचा देश. तिथे या गोरिलांना मोठा मान आहे. तिथे दरवर्षी एक आगळावेगळा गोरिला महोत्सव आयोजित केला जातो. ‘क्विता इझयाना’ नावाने तो ओळखला जातो. 2005 पासून ही प्रथा सुरू झाली. नुकत्याच जन्मलेल्या गोरिलाच्या बाळाचं बारसं असं त्याचं स्वरूप असतं.” रेंजरने दिलेली माहिती ऐकून माझ्या मनाला क्विता इझयाना सेरिमनीचे वेध लागले होते!

शब्दांकन ः निलय वैद्य

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; फक्त 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; फक्त 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक
मुंबईच्या तलावात फक्त 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त...
‘तुला पँटमध्ये लघवी करावी लागेल’, त्या सीनसाठी दिग्दर्शकाची विचित्र मागणी; अभिनेत्रीने सांगितला तो धक्कादायक प्रसंग
संजूबाबा आणि रेखा यांनी कोणाच्या न कळत केलेलं लग्न? काय आहे संपूर्ण प्रकरण
नुकसानभरपाई देऊन जीव परत आणता येतात का? वाघांच्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक
हैदराबादमध्ये चारमिनारजवळ भीषण आग, 17 जणांचा मृत्यू
Latur News- अवकाळीच्या पहिल्याच पावसात नालेसफाई च्या कामावर प्रश्नचिन्ह
Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन?