अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी मेलोनींचे गुडघे टेकून केले स्वागत
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी रेड कार्पेटवर गुडघे टेकून स्वागत केले. यावेळी त्यांनी हात जोडून नमस्तेसुद्धा म्हटले. यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेटसुद्धा घेतली. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या स्वागताची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जॉर्जिया मेलोनी या सध्या अल्बेनियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी थेट पंतप्रधान एडी रामा उपस्थित राहिले. मेलोनी यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले होते.
शुक्रवारी अल्बेनियाची राजधानी तिराना येथे युरोपियन पॉलिटिकल कम्यूनिटी समिटसाठी जॉर्जिया आपल्या शिष्टमंडळासह पोहोचल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी 2030 पर्यंत देशाला युरोपियन युनियनमध्ये सामील करण्याचे आश्वासन दिले आहे. एडी रामा यांनी जॉर्जिया मेलोनी यांचे गुडघे टेकून स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी जानेवारीमध्ये अबूधाबीत आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड फ्यूचर एनर्जी समिटमध्ये जॉर्जिया यांचे गुडघे टेकून स्वागत केले होते. दरम्यान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया हिंदुस्थान दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळीही त्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List