Mumbai News – मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
मुंबई विमानतळ आणि हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. अफझल गुरु आणि एस. शंकर यांच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात येणार असल्याचा दावा ईमेलमध्ये करण्यात आला आहे. ईमेलचा दखल घेत दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि “इन्स्पेक्टर साब” या अधिकाऱ्याला उद्देशून हा ईमेल पाठवण्यात आला आहे. हा धमकीचा ईमेल 16 मे रोजी विमानतळ पोलीस स्टेशनच्या अधिकृत ईमेल आयडी – [email protected] वर प्राप्त झाला आहे. ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल महेश ज्ञानदेव कदम यांनी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ईमेल पाहिल्यानंतर तात्काळ वरिष्ठांना याबाबत सूचना दिल्या.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, [email protected] या आयडीवरून हा मेल आला. यात ताजमहाल पॅलेस हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ या दोन्ही ठिकाणी सात आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आलेत असा दावा करण्यात आला. कॉन्स्टेबल कदम यांनी ताबडतोब ड्युटी सुपरवायझर पीआय व्हाटकर आणि वरिष्ठ पीआय माने आणि एटीसी अधिकारी पीएसआय सुनील खैर यांना कळवले. यानंतर बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (बीडीडीएस) वेस्ट-1 टीमला पाचारण करण्यात आले.
बीडीडीएस टीमने विमानतळ टर्मिनल, निर्गमन गेट 1 आणि 2, आगमन गेट, टॅक्सी स्टँड, हॉटेल ताज सांताक्रूझचा परिसर आणि एटीसी टॉवरची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात ईमेल पाठवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List