वेधक- हरित भविष्यासाठी सीड बॉल
>> गणेश नाईक
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचारांची रुजवणूक, स्थानिक जैवविविधता वाढवण्याबरोबरच वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी वेंगुर्लेतील मठ येथील डॉ. रामजी खानोलकर केंद्र शाळेने मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सीड बॉल उपक्रम राबवला. हरित आच्छादन वाढवणारा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.
शहराच्या पावलावर पाऊल ठेवत ग्रामीण भागातही सिमेंट काँक्रीटची जंगले उभी राहून लागली. विकासाच्या नावाखाली होणाऱया बेसुमार जंगलतोडीमुळे वसुंधरा धोक्यात आली आहे. वर्षाला वाढणारे पाण्याचे दुर्भिक्ष, तुटणारी अन्नसाखळी वाचवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात झाडे लावणे काळाची गरज बनली आहे. सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण वाढवण्यासाठी सिंधुदुर्गात वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील डॉ. रामजी खानोलकर केंद्र शाळेने एक पाऊल पुढे टाकत मे महिन्याच्या सुट्टीचा सदुपयोग केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचारांची रुजवणूक, स्थानिक जैवविविधता वाढवण्याबरोबरच वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळेने अशा प्रकारचा उपक्रम राबवला आहे. आज झपाटय़ाने वाढणारे शहरीकरण, जंगलतोड शिवाय मोकळ्या जागाही कमी होत आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून तापमानाच्या पाऱयाचा आलेख वर्षानुवर्षे वाढताच आहे. सीड बॉल हा हरित आच्छादन वाढवण्याचा एक सोपा मार्ग आहे. प्रदूषण, तापमान वाढ, पावसाचे चक्र बिघडणे यांसारख्या समस्यांवर वृक्षारोपण हा प्रभावी उपाय उरला आहे. सीड
बॉलद्वारे झाडे सहज लावता येतात. मातीची धूप रोखण्यासाठी नापिक जमीन लागवडीखाली आणणे गरजेचे बनले आहे.
भूजल पातळी वाढवण्याबरोबरच पावसाचे पाणी जमिनीत साठवून ठेवण्यात झाडांची महत्त्वाची भूमिका आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष झाडे लावणे व काळजी घेण्याचा अनुभव मिळाल्यास निसर्गाची खरी जाणीव होते. सीड बॉल बनवण्यासाठी महागडय़ा साधनांची गरज नसल्याने यासाठी लागणारे साहित्य सर्वत्र सहज वापरता येते.
सीड बॉल म्हणजे बीजगोळी. बीज (बी) + माती (माती) + कंपोस्ट (सेंद्रिय खते) यांच्या मिश्रणाने बनवलेली लहान गोल आकाराची गोळी. हे एक सोपे व स्वस्त तंत्र आहे. ज्याद्वारे झाडांची लागवड किंवा निसर्ग पुनरुत्थान सहज शक्य होते. ज्या ठिकाणी थेट बियाणे पेरणे अवघड असते अशा डोंगराळ, नापीक किंवा कठीण भूभागावार सीड बॉलचे हे तंत्रज्ञान फार उपयोगी पडणार आहे. सीड बॉलद्वारे अधिक झाडे उगवली जातात. हवा शुद्धीकरणाबरोबरच प्रदूषण कमी होते. परिसर हरित बनतो. स्थानिक झाडे व वनस्पती वाढल्यामुळे पक्षी, फुलपाखरे, मधमाशा यांसारख्या प्राण्यांनाही निवासस्थान मिळते. मे महिन्याच्या या सुट्टीतील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून झाडांचे जीवनचक्र, त्यांची काळजी कशी घ्यावी हे समजले आहे. आज लावलेली झाडे पुढच्या पिढय़ांना शुद्ध हवा, सावली, फळं व औषधं देणार असल्यामुळे त्याचा फायदा दीर्घकालीन होणार आहे. शाळांनी अशा प्रकारचा उपक्रम राबविल्यास निसर्ग संपदा वाढण्यास मदत होणार आहे. सीड बॉल घरी बनवता येते. माती व सेंद्रिय खतामुळे बियाणाला सुरुवातीला आवश्यक पोषण, तर बियांना बाहेरून संरक्षण मिळते. त्यामुळे बीज टिकून राहते व नष्ट होण्याचा धोका कमी होतो.
सीड बॉलद्वारे झाडे उगवण्याचे (अंकुरणाचे) प्रमाण अनेक गोष्टींवर अवलंबून असते. सरासरी 30 टक्के ते 60 टक्क्यांपर्यंत बीज उगवण्याचे प्रमाण नोंदवले जाते. काही वेळा योग्य परिस्थितीत ते 70 टक्क्यांपर्यंतसुद्धा जाऊ शकते. योग्य काळ आणि चांगली तयारी केल्यास 60 टक्क्यांपर्यंत झाडे उगवतात. म्हणजे प्रत्येक 100 सीड बॉलमध्ये साधारण 50-60 झाडे उगवू शकतात. पक्षी व फळांसाठी उपयुक्त झाडे निवडल्यास जैवविविधता वाढते.
काळजी घ्या
लहान मुलांना बियाणे तोंडात न घालण्याची सूचना देणे, शक्यतो स्थानिक व जलद उगम होणारी बियाणे सीड बॉलसाठी वापरली जावी. शक्य असल्यास अंकुरित झाडांची नोंद ठेवणे. संवर्धनासाठी पाणी देण्याचे नियोजन, झाड उगवल्यानंतर त्याचे चित्र काढणे व वाढ, पाने यांची माहिती लिहिणे आदी गोष्टी मुलांकडून करून घेता येतील.
असा करता येणार सीड बॉल
सीड बॉल तयार करताना करंजी, गुलमोहर, सीताफळ, आवळा, जांभूळ या स्थानिक वनस्पतींसह इतर रानझाडे यांच्या बिया एकत्र करायच्या त्यानंतर पाच भाग सेंद्रिय किंवा बारीक गाळयुक्त माती, तीन भाग गोवरखत किंवा गांडूळ खतासारखे सेंद्रिय कंपोस्ट खत मिसळावे. माती व खत नीट मिसळून त्यात थोडं-थोडं पाणी टाकत घट्ट गोळा तयार करावा. प्रत्येक गोळीत एक-दोन (जास्तीत जास्त 5/6) बियाणे टाका. बियाणे टाकल्यानंतर साधारण लाडवाएवढय़ा आकाराच्या गोळ्या तयार कराव्या. बनविलेल्या गोळ्या सावलीत दोन ते तीन दिवस नीट वाळवाल्यानंतर सीड बॉल तयार होतो.
शब्दांकन ः स्वप्नील साळसकर
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List