आगळंवेगळं- शंख-निरसन

आगळंवेगळं- शंख-निरसन

>> मेघना साने

शंखांवर संशोधन करणारे आनंद भिडे शंखांची भौगोलिक, जीवशास्त्रीय व पौराणिक अशा अनेक अंगांनी ओळख करून देतात. निरनिराळ्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये ‘शंख शक्ती’ व यासंदर्भातील विषयांवर व्याख्याने देणाऱया आनंद भिडे यांच्या या विषयातील संशोधनाचा हा अधिक परिचय.

लहानपणी समुद्रकिनाऱयावर फिरताना छोटे-छोटे शंख, शिंपले गोळा करण्याचा आनंद बहुतेकांनी घेतला असेल. मोठेपणीसुद्धा शंखांबद्दलचे आकर्षण कायम राहते. समुद्रावर पोहायला गेले असता एखादा सुंदर नक्षीदार शंख किंवा शिंपल्याची पेटी मिळाली तर एखादा मोठा माणूससुद्धा मूल होऊन ते उचलून घेतो. शंख हे मुळात गोगलगायीचे संरक्षक कवच असते व ते तिचे घरही असते. मोठमोठे शंख खोल पाण्यात आढळतात. किनाऱयावर मात्र लाटेबरोबर आलेले हलक्या वजनाचे लहानसहान शंख सापडतात. गोवा, अलिबाग येथील समुद्रकिनाऱयावर शंखांच्या माळा, झुंबरे विकणारे आपल्याभोवती फिरत असतात. शंखांच्या दागिन्यांचाही कधीकधी स्त्रियांना मोह होऊन जातो.

गेल्याच महिन्यात ठाण्यात पोखरण 2 येथे आनंद भिडे यांनी स्वत जमविलेल्या शंखांचे प्रदर्शन लागले होते. या तरुणाने इंग्रजीत ‘शंख शक्ती’ व मराठीत ‘शंख शक्ती विज्ञान’ ही पुस्तके लिहिल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले होते. शंखांवर संशोधन करणाऱया या तरुणाचे निरनिराळ्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये ‘शंख शक्ती’ या व इतर काही विषयांवर व्याख्याने, कार्यक्रम वगैरे होत असतात. म्हणून आम्ही मुलांना घेऊन ते प्रदर्शन पाहायला गेलो. आनंद यांच्याकडे 140 प्रकारचे शंख आहेत आणि त्यांनी जमविलेल्या शंखांची एकूण संख्या आहे 670! त्यांनी मिळवलेला सर्वात मोठा शंख 19 इंच लांबीचा आहे. शंखांमध्ये किती वैविध्य असू शकते हे या प्रदर्शनात दिसते. ते विविध आकारांचे व विविध रंगांचे तर होतेच, पण काही दक्षिणावर्ती, वामावर्ती, तर काही मध्यवर्ती होते. दक्षिणावर्ती शंख हे उजव्या बाजूस उघडतात. पूजेसाठी हे वापरतात.
आनंद यांच्याशी बोलण्याची संधी मिळाल्यावर आमच्या मुलांनी त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्याकडून खूप माहिती मिळवली. आनंद हे ठाण्यातील सुप्रसिद्ध योगशिक्षिका व योगाभ्यासक सुजाता भिडे यांचे सुपुत्र. त्यांच्या घरातील वातावरण आध्यात्मिक आहे. शंखांची माहिती देताना आनंद थेट महाभारतापासून सुरुवात करतात. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर पांचजन्य शंखाचा घोष केल्यावर पांडवांमध्ये ऊर्जा निर्माण झाली. महाभारतकालीन प्रत्येक महापुरुषाकडे त्याचा वैशिष्टय़पूर्ण शंख होता. कुरुक्षेत्रात तो वाजविलाही जात होता. पाच पांडवांपैकी अर्जुनाचा ‘देवदत्त’, भीमाचा ‘पौंड’, धर्मराजाचा ‘अनंतविजय’, नकुलाचा ‘सुघोष’ आणि सहदेवाचा ‘मणिपुष्प’ नावाचा शंख असल्याचा उल्लेख सापडतो. कर्णाच्या शंखाचे नाव ‘हिरण्यगर्भ’ होते. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे ते शंख होते. युद्धभूमीवर अनेक कारणांसाठी शंखध्वनी केला जात असे. युद्ध हे सूर्योदयाला सुरू करून सूर्यास्ताला युद्धविराम करण्याची पद्धत होती. मोठय़ा मैदानात या दोन्ही सूचना देण्यासाठी शंखध्वनी केला जात असे. या युद्धात जेता आपला विजय घोषित करण्यासाठी शंखनाद करीत असे. पुराणात भगवान विष्णूला समुद्रमंथनातून शंख मिळाला. तो ‘पांचजन्य’ शंख विष्णूला अतिशय प्रिय असल्यामुळे त्याच्या हातात दिसतो.

‘एवढे शंख कुठून जमविले?’ हे मुलांचे कुतूहल शमविताना आनंद यांनी सांगितले की, हे समुद्राच्या खोल पाण्यात असलेले शंख आपल्याला सहजासहजी मिळू शकत नाहीत, पण मच्छीमार मासे पकडण्यासाठी आपले जाळे टाकतात तेव्हा माशांबरोबर कधी कधी मोठे शंखही येतात. त्यातील प्राणी जिवंत असले तर ते परत समुद्रात सोडतात आणि नुसता शंख असेल तर ते डिलरला विकतात. शंखांच्या डिलरकडून आपल्याला ते विकत घ्यावे लागतात. नाद निर्मितीसाठी जो शंख वापरला जातो त्या शंखाची किंमत 1000 ते 10,000 रुपयेसुद्धा असू शकते. शंखाच्या आत गोगलगाय असते. त्यांचे प्रकारही खूप आहेत. ऐकून थक्क व्हाल! 45000 जातींच्या गोगलगायी जगात आहेत असे आजवर निदर्शनास आलेले आहे.

आयुर्वेदिक औषधांमध्ये ‘शंखपुष्पी’, ‘शंखभस्म’, ‘शंखवटी’ ही नावे आपण ऐकलेलीच असतात, पण ही औषधे विशिष्ट शंखांपासूनच केलेली असतात. आनंद भिडे यांनी सांगितल्याप्रमाणे शंखांची A, B आणि C अशी प्रतवारी केली जाते. A म्हणजे उत्तम जातीचे शंख, ज्यांच्यापासून आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात. B हे थोडे कमी प्रतीचे शंख, जे पूजेत वापरले जातात. या शंखांतून शंखध्वनी केल्यास त्याच्या कंपनांपासून आपल्या शरीराला फायदा होतो. सभेत शंख वाजवला तर सकारात्मक ऊर्जा तयार होते अशी धारणा आहे. शिवाय यातील लहान आकाराचे शंख आभूषणे व शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरतात. त्यापेक्षाही कमी प्रतीचे म्हणजे C प्रतीचे शंख हे सिव्हिल वर्कसाठी वापरले जातात.

अत्यंत मंद चालीच्या मऊसूत अशा गोगलगायी स्वसंरक्षणासाठी पाठीवर असे कडक नक्षीदार शंख निर्माण करतात आणि त्यांच्या तोंडात 15000 ते 20000 दात असतात. ही निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. शंखांमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असते. शंख हे समुद्रातच सापडतात असे नाही तर ते गोडय़ा पाण्यात तसेच शेतातसुद्धा सापडतात. झाडाच्या पानांचा नाश्ता करून गोगलगायींनी झाडे नष्ट करू नये म्हणून शेतकरी अनेक उपाय करून या गोगलगायींचा नायनाट करतात. गोगलगाय जेव्हा प्रजननक्षम होते तेव्हा ती दरवर्षी नऊ वेळा प्रत्येकी एक लाख अंडी घालते. प्रत्येक वेळी फक्त एकच अंडे तग धरून राहते आणि त्यातून पुढे नवीन गोगलगाय तयार होते.

कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेऊन व्यवस्थापनशास्त्राचा डिप्लोमा घेतल्यावरही आनंद यांनी नोकरी करण्यापेक्षा वडिलांचा मंगल कार्यालय भाडय़ाने देण्याचा व्यवसाय पुढे नेण्याचे ठरवले. ‘श्रीहरीहर’ नावाचे त्यांचे नवे पुस्तक आले आहे. ते रुद्राक्ष आणि शाळीग्राम या विषयावर आहे. याशिवाय शंखशक्ती व इतर अनेक विषयांवर भाषणे देताना ते शंखांची भौगोलिक, जीवशास्त्राrय व पौराणिक अशा अनेक अंगांनी ओळख करून देतो. शंखांविषयीचे त्यांचे संशोधन सुरूच आहे.
[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही… वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही…
सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाली, या निमित्त महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार...
70 वर्षांच्या अभिनेत्याचे 30 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; झाला ट्रोल
आधी विराटवर चिडला, नंतर केली उपरोधिक टिप्पणी; आता क्रिकेटरने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे बदलले सूर
लोकशाहीचे तीन स्तंभ समान- सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र भेटीदरम्यानच्या शिष्टाचारातील त्रुटींवर तीव्र नाराजी
गळ्यात वरमाला घालताच अवघ्या तीन सेकंदात कुंकू पुसलं, नवरदेवाच्या मृत्यूमुळे लग्नघरावर शोककळा
‘विराट कोहलीला भारतरत्न दिला पाहिजे…’, CSK च्या माजी खेळाडूची सरकारकडे मागणी
असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील, ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ समोर