Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन?
मिनी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटा आताच मैदानात उतरला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोणत्या वॉर्डात ताकद?
जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदार संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेत्यांच्या दौर्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे आदेश शिवसेना भवन येथून देण्यात आले आहेत. राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का? याची माहिती तसेच 2012 आणि 2017 च्या महापालिकेच्या मतदार संघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
10 जणांची टीम करणार तयारी
शहरामध्ये शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, प्रभागप्रमुख, 2 वार्डसाठी उपविभागप्रमुख आणि प्रत्येक वॉर्डसाठी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे तर ग्रामीण भागात तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, गावपातळीवर शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. या संघटनात्मक रचना पूर्ण करून यादीचा अहवाल आणि आपल्या स्थानिक भागातील कोणते वार्ड अथवा मतदार संघ लढवणे आवश्यक आहे याची माहिती 19 जूनपर्यत शिवसेना भवनात जमा करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यातील महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यावर दिलेली जबाबदारी अशी आहे.
1. ठाणे, नवी मुंबई, मीरा भायंदर – सुभाष देसाई, राजन विचारे
2. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर- संजय राऊत
3. धुळे, अहिल्यानगर – अनिल परब, संजय राऊत
4. कल्याण – डोंबिवली – अनिल परब
5. उल्हासनगर, पनवेल शहर – अनंत गिते
6. अमरावती, अकोला – अरविंद सावंत
7. नागपूर, चंद्रपूर – भास्कर जाधव
8. वसई – विरार शहर, भिवंडी निजामपूर शहर – विनायक राऊत
9. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे
10. लातूर, सोलापूर – चंद्रकांत खैरे
11. परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर – अंबादास दानवे
12. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाड – सुनील प्रभू
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List