स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले

स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले

“हा एक कसोटीचा क्षण आहे. दिवस येतात, दिवस जातात. शरद पवार म्हणाले, सरकार येतं, तसं सरकार जातं. हे सरकार सुद्धा उद्या जाणार आणि ते आपल्याला घालवावंच लागेल. मला हे व्हायचं, आहे मला ते व्हायचं आहे, म्हणून नाही. स्वर्गासारख्या आपला देश आहे. त्या देशाचा नरक करण्याचा जो प्रयत्न चालू ठेवला आहे, त्यांना नरकात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला लढावं लागेल. नुसतं लढावं नाही तर, जिंकावं लागेल”, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना ते असं म्हणाले आहेत. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला संजय राऊत यांच्या आई, वहिनी, दोन्ही मुली, जावई आणि दोन्ही भाऊ उपस्थित आहेत. घर जर ढेपाळलं तर, लढवय्या हा लढूच शकत नाही. संजय राऊत यांच्या आईने आणि सर्व कुटुंबीयांनी जे धाडस दाखवलं, त्या धाडसाला सीमाच नाही. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी ठाकरे त्यांच्या घरी गेलो होतो. यावेळी आम्ही त्यांना धीर देण्या ऐवजी संजय राऊत यांच्या आई आणि सगळ्यांनी आम्हालाच धीर दिला. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटत राहतात. काही कायमची सोबत राहतात आणि काही संधीसाधू असतात. संधी सध्या झाली की पळून जातात. मला असं वाटतंय की, आज आपल्या सगळ्यांची परीक्षा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घेत आहेत. आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं, त्यांच्याकडून कोणी काय घेतलं, हे ते बघत आहेत. त्यांचं एक वाक्य आहे, ‘शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.’ संजय राऊत यांनी पुस्तकाचे नाव नरकातला स्वर्ग ठेवलं आहे. जो माणूस नरकात स्वर्ग शोधतो, तो काय धाटणीचा माणूस असेल, हे वेगळं सांगायला नको. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुषभरात मराठी माणूस आणि हिंदूंना आत्मविश्वास आणि जिद्द दिली. नाही तर आज मुंबई आणि महाराष्ट्रात आपली परिस्थिती काय असती, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ते बघत आहेत की, मी जे दिलं, ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणारे किती आहेत.”

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज जे स्वर्गात गेलेत त्यांच्या दृष्टितीने त्यांना सुद्धा हा कार्यक्रम बघितल्यानंतर हेवा वाटत असेल. मगाशी संजय राऊत तुमचं भाषण सुरु असताना जणू तुम्ही एक विरोधी पुस्तक लिहिलं आहे, अशा थाटात बोलत होता. त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल, अरे आपण सुद्धा इथं राहिलो असतो. नरक आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत की, खोट्या आहेत? याची कल्पना नाही. पण जिथे आहोत तिथे आनंदाने राहावं, दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही, तर निदान त्रास तरी देऊ नये, एवढं जरी माणसाने पाळलं तरी, असं वाटतं आपण आयुष्य जगलो. आज आपण जे बघत आहोत, याला लोकशाही मानायची की हुकूमशाही? हा प्रश्न आणि त्यांचं उत्तर हे सोपं आहे. पण हुकूमशहा कोणीही असला तर त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. हिटलरला संपूर्ण जग घाबरत होतं. पण संजय राऊत तुम्ही जे आधी लिहायचे त्यात एक आवडीचा शब्द होता, ‘नियती’. नियतीने कदाचित त्याला (हिटलरला) सांगितलं असेल, सगळं जग घाबरतं, तू नाही ना घाबरत. मग घालून घे स्वतःला गोळी. मग त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली. हा हुकूमशहाचा शेवट असतो.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “या पुस्तकासंदर्भात संजय राऊत यांच्या मुलाखती येत आहेत, त्यातले काही प्रसंग चर्चिले जात आहे. यातच एक प्रसंग आहे तो, अमित शहा यांचा. मला जर कोणी विचारलं की, अमित शहा तुमच्या घरी आले होते का? बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली होती का? मी सांगणे मला आठवत नाही. कारण आपल्या घराण्याने, आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील तर, उपकार हे मोजायचे नसतात. उपकार करायचे असतात, पण मोजायचे नसतात. उपकाराची फेड ही कृतज्ञाने करायची की आपकाराने करायची, हे ज्याच्या त्याच्यावर असतं. काही वेळेला असं वाटतं की, कोणाला मदत करताना सुद्धा आपण विचार करू शकत नाही. साकेत गोखले तुम्ही आताच सांगतलं की, एक कैदी असा होता की, ज्याला जामीन मंजूर झाला, पण त्याकडे 500 रुपये नव्हते भरायला. काय करायचं या गोष्टीला? इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार सुरू आहेत. तर एका बाजूला एक कैदी 500 रुपये नाही म्हणून तुरुंगात पडला आहे. ही जी पद्धत आहे, त्याला लोकशाही म्हणायचं आपण? हे एकाधिकारशाहीने चाललं आहे. मला आठवत आहे की, अनिल देशमुख माझ्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. असा कोणता देश असेल, ज्या देशात मुख्यमंत्र्यांना अटक होते. अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. हेमंत सोरेन आणि गृहमंत्र्यांना अटक झाली. मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजींना आणि सीएसला सीबीआयने बोलवलं होतं. ज्यांच्या शेंड्या केंद्राच्या हातात असतील आणि विरोधी पक्षांच्या सरकारमध्ये अशी माणसे असतील, तर त्यांचं काम ते कसं करू शकतील. ममता बॅनर्जी यांनाही तोच अनुभव आला होता. त्यांच्या सीएसने शेवटी राजीनामा दिला. आपल्या देशात संघराज्य पद्धती आहे. केंद्र हा शब्द नाही. केंद्र सरकारला जितका अधिकार आहे, तितकाच अधिकार कायद्याने राज्य सरकारला सुद्धा आहे आणि असलाच पाहिजे. ईडी, आयटी, सीबीआय आणि पीएमएलए कायदा लावण्याचा अधिकार दिल्लीतील सरकारला असेल तर, तोच अधिकार आमच्या राज्य सरकारला सुद्धा पाहिजे. टाका त्यांच्यावर सुद्धा धाडी, बसवा त्यांना सुद्धा आतमध्ये. संजय राऊत, साकेत गोखले आणि अनिल देशमुख हे भोगून आले आहेत. या तिघांकडेही चार्ज द्या, मग ते सांगतील त्यांच्यावर धाडी टाका. त्यांना तुरुंगात टाका आणि सिद्ध करा की, तुम्ही निर्दोष आहे. या सगळ्या प्रकाराविरोधात लढत राहिलं पाहिजे.”

ते म्हणाले की, “आज निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी आले होते, वन नेशन, वन इलेक्शन. यासाठी साकेत गोखलेही आले होते. आपल्याकडून अनिल परब आणि अनिल देसाई यांना मी पाठवलं होतं. वन नेशन, वन इलेक्शन, फार गोंडस आहे. पण निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे आहे. आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातोश्रीने सांगितलं की, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. संशय जर का मोकळा करायचा असेल तर, एक तरी निवडणूक देशात बॅलेट पेपरवर घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा. पण ते होणार नाही. मग दुसरा विषय मी त्यांना मांडायला सांगितला की, वन नेशन, वन इलेक्शनमध्ये सगळ्यांना एका पातळीवर उभं करा. कारण वन नेशन म्हटलं तर, देशाचा पंतप्रधान आहे आणि देशाचा पंतप्रधान हा एका पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही. एक तर त्याने प्रचारक होऊ नये आणि प्रचार करायचा असेल तर, स्वतःच्या पक्षाबरोबर, इतर पक्षांचा आणि अपक्ष उमेदवारांचा प्रचार सुद्धा त्यांनी केला पाहिजे. तर मी म्हणेल लोकशाही आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फिनलंडमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, अपघातात अनेक जणांचा मृत्यू फिनलंडमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, अपघातात अनेक जणांचा मृत्यू
पश्चिम फिनलंडच्या युरा प्रदेशात शनिवारी दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. फिनिश...
Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ जण जखमी
तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका
सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका
स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू