लाडक्या ठेकेदारासाठी एमआयडीसीची कोरड्याठाक विहिरीवर पाणी योजना; दीड कोटी रुपयांचा झाला चुराडा
एमआयडीसीने लाडक्या ठेकेदारासाठी कोरड्या विहिरीवर दीड कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवली आहे. मोहघरला पाणीपुरवठा करण्यासाठी खोदलेल्या या विहिरीला झऱ्याचा टिपूसही लागला नाही. मात्र दीड कोटीची योजना राबविण्यासाठी ठेकेदाराने ही विहीर टँकरचे पाणी ओतून भरवली आणि योजना पूर्ण झाल्याचे दाखवले. विहिरीला पाण्याचा टिपूस नसल्यामुळे ही पाणीपुरवठा योजना पूर्णपणे फेल गेली असून मोहघर परिसरातील ग्रामस्थांची पाण्यासाठी असलेली वणवण संपलेली नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मोहघरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खामघर ते मोहघर अशी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून विहीर खोदण्यात आली. मात्र या विहिरीत पाण्याचा टिपसूही लागला नाही. मात्र ठेकेदाराचे चांगभले करण्यासाठी पाण्याचा टिपूस नसलेल्या या विहिरीवर पाणीपुरवठा योजना भासवण्याचा घाट एमआयडीसी प्रशासनाने घातला. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ही कोरडी विहीर पाण्याचे टँकर ओतून भरवण्यात आली. विहीर कृत्रिमरित्या भरल्यानंतर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार ठेकेदाराला त्याचे शिल्लक असलेली बिलेही देण्यात आली. मात्र कोरड्या विहिरीवर राबविण्यात आलेल्या या योजनेमुळे या भागातील आदिवासींची पाण्यासाठी होत असलेली वणवण अद्यापही थांबलेली नाही. या पाणीपुरवठा योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ हरिचंद्र भोईर यांनी केली आहे.
टँकरने पाणीपुरवठा
मोहघर पाणीपुरवठा योजनेवर सुमारे दीड कोटी रुपये एमआयडीसीच्या माध्यमातून खर्च करण्यात आले. मात्र कोरड्या विहिरीवर राबविण्यात आलेली ही योजना फेल ठरली. त्यामुळे मोहघर आणि परिसराला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करणारे टँकर हे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचे आहे. त्यामुळे टँकरने होत असलेल्या पाणीपुरवठ्यातही मोठा घपला केला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
दुरुस्तीसाठी 25 लाखांची निविदा
मोहघर पाणीपुरवठा योजनेतून गेल्या सात वर्षांत हंडाभर पाण्याचा पुरवठा झालेला नाही. विहीर कोरडी असल्यामुळे ही योजना उद्घाटन झाल्यापासून बंदच आहे. आता याच योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. हा खर्च पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी आहे की ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List