ये एरिया मेरा है, यहा का मैं भाई हूं! ठाण्यात भररस्त्यात तरुणाची भोसकून हत्या
ये एरिया मेरा है, यहा का मैं भाई हूं… अशी धमकी देत ठाण्यात भररस्त्यात तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेत दर्शन शिंदे (27) या तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी चौकडीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तुषार निरुखेकर आणि आकाश शिंदे या दोघांना अटक केली आहे, तर आर्यन गढीवाल आणि भाल हे दोघे फरार आहेत. या घटनेने भीतीचे वातावरण पसरले असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गेल्या तीन वर्षांत ठाण्याचा क्राइम रेट प्रचंड वाढला आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुंड हैदोस घालत असताना गृह विभाग सफशेल फेल झाला आहे. लक्ष्मी चिरागनगर येथे गुरुवारी संध्याकाळी दर्शन शिंदे आणि त्याचा मित्र केतन साटम गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणारे आर्यन गढीवाल, तुषार निरुखेकर, आकाश शिंदे आणि भाल असे चौघे तेथे आले. त्यावेळी ये एरिया हमारा है, यहा के हम भाई है… असे सांगत जुने भांडण उकरून काढत दर्शन शिंदे याला शिवीगाळ केली. त्यानंतर या वादाचे रूपांतर भांडणात झाले. या दरम्यान तुषारने दर्शनचे हात पकडल्यावर आर्यन याने त्याच्या हातातील हत्याराने दर्शनच्या छातीवर वार केले. गंभीर जखमी दर्शन याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वर्चस्व प्रस्थापित करायचे होते
तुषार व आर्यन यांना आपल्या परिसरात वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. जुन्या रागातून चौघांनी दर्शन शिंदे याला मारहाण केली आणि यात दर्शनचा मृत्यू झाला. या दोन टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्य असून केतन साटम याच्या तक्रारीवरून त्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List