विरोधी पक्षांनी सरकारच्या चुकांचे समर्थन करणे देशाला परवडणारे नाही; संजय राऊत यांची रोखठोक भूमिका
जम्मू कश्मीरमध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या हत्याकांड आणि दहशतवादी हल्ल्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त पोकश घोषणा करू नये. बोलघेवडेपणा करू नये, त्यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच विरोधी पक्षांनी आधी शहा यांचा राजीनामा घ्यावा, त्यानंतर सरकारला पाठिंबा द्यावा, अशी भूमिकाही घेतली.
विरोधी पक्षांनी दहशतवाद्यांना धडा शिकवा, अशी भूमिका घेतली. मात्र, युद्धाची भाषा कोणी केली आहे, घरात घुसून मारू, ही भाषा कोणाची आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अशी भाषा केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले, चुनचुन कर मारेंगे. ते फक्त घोषणा करत आहेत. कृती करण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना चुनचुन कर मारतात, त्यांच्यावर कारवाई करतात. तसे त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना चुनचुन कर मारावे, असेही संजय राऊत म्हणाले.
गेल्या 10 वर्षात कश्मीरमध्ये झालेल्या प्रत्येक हत्याकाडांला, दहशतवादी हल्ल्याला गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आहेत. असे असूनही अशा व्यक्तीला पंतप्रधान मोदी यांनी त्यांना पदावर का ठेवले आहे, हे मोठे रहस्य असल्याचे ते म्हणाले. पहलगाममधील 27 जणांच्या बळीला ते कारणीभूत आहेत. ते काय चुनचुन कर मारणार, ते या घटनेला जबाबदार आहेत. त्यांचा राजीनामा घेण्याची गरज आहे. विरोधी पक्षांनी आधी शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे, त्यानंतर सरकारला पाठिंबा देण्याची गोष्टी करायला हव्या, ही आमची भूमिका आहे. सर्वपक्षीय भूमिकेतही आम्ही ही भूमिका मांडली आहे. देश महत्त्वाचा आहे. फक्त बोलघेवडे राज्य करू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले.
27 जणांचे बळी गेले, त्यांचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. माजी नेत्याचे निधन झाले तरी तीन दिवस दुखवटा असतो. झेंडा अर्ध्यावर खाली उतरवण्यात येतो. परदेशी माजी राष्ट्राध्यक्षांचे निधन झाले तरी देशात दुखवटा असतो. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात येतात. अशा परिस्थितीत 27 जणांच्या मृत्यूचे दुःख केवढे मोठे आहे. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नाही. पुलवामा हत्याकांड आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर भाजप किंवा त्यांच्या नेत्यांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आपल्याला दुःखाचा लवलेशही दिसला नाही. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान बिहारमध्ये प्रचार दौऱ्यात, दुसऱ्या दिवशी मुंबईत सिनोतारकाताऱ्यांसोबत, त्यांनंतर तिसऱ्या दिवशी गौतम अदानीसह, त्यानंतर पवन कल्याणसोबत हास्यविनोद करतात. दुखवटा, राष्ट्रीय शोक आहे की नाही, सामान्य माणसाच्या जिवाला काही किंमत आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.
दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नव्हते, असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वपक्षीय बैठकीत अमित शहा यांनी चूक असून ती मान्य केली आहे. त्यांची चूक मान्य आहे, तर त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. गेल्या 10 वर्षात जम्मू कश्मीरमध्ये जेवढे सैनिक, पोलीस, सर्वसामान्य नागरिक मारले गेलेत, त्या सर्वांना जबाबदार अमिश शहा आहेत. असे असूनही ते पदावर असून सत्ता भोगत आहेत, ही आपल्या देशाची स्थिती आहे. या गंभीर मुद्दयावर संसदेचे विशेष अधिवेशन घेत यावर चर्चा झाली पाहिजे. मात्र, जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे विशेष अधिवेशनाची मागणी होत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हीच मागणी केली आहे. संसदेत विरोधी पक्षांना कश्मीर मुद्द्यावर बोलू दिले जाणार नाही. वेगळ्याच विषयावर गोंधळ घालत कामकाज तहकूब करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारच्या चुकांचे समर्थन करणे देशाला परवडणारे नाही, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List