विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा…
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटला अलविदा केले. विराट कोहलीने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होताना त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने कसोटी क्रिकेटमुळे तो कसा घडला याबद्दलही त्याने सांगितले आहे. विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी त्याच्या कसोटी क्रिकेटमधील योगदानाबद्दल भाष्य केले. तसेच अनेक गोष्टींचे कौतुकही केले. आता नुकतंच विराटची पत्नी अनुष्का शर्माने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
विराटची पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने एक खास फोटो शेअर करत विराटच्या लहान लहान गोष्टींचे कौतुक केले आहे. प्रत्येक कसोटी सामन्यानंतर विराटमध्ये होणारे बदल आणि क्रिकेटबद्दलचे त्याचे प्रेम याबद्दलही तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.
अनुष्का शर्मा काय म्हणाली?
“तुझ्या असंख्य विक्रमांबद्दल आणि कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल सगळेच बोलतील. पण, मला कायम तू कधीही न दाखवलेल्या त्या अश्रूंची आठवण राहील. या खेळाच्या फॉरमॅटबद्दल तुझ्या मनात असलेल्या अतूट प्रेमाबद्दलचीही आठवण मला राहील. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तुझ्यात एक वेगळा बदल मला जाणवला… तू अधिक शांत आणि विनम्र झालास आणि या संपूर्ण प्रवासात तुला विकसित होत असताना पाहणे हे माझे भाग्य आहे. माझी नेहमीच अशी इच्छा होती की तू कसोटी सामन्यांदरम्यान निवृत्त व्हावा, पण, तू नेहमीच तुझ्या मनाचे ऐकलेस आणि म्हणूनच ‘माय लव्ह’ मी एवढेच म्हणेन की, तू या खेळाच्या फॉरमॅटमध्ये आज सर्व काही मिळवलं आहेस.” असे अनुष्का शर्माने पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनुष्काच्या या भावनिक पोस्टवर विराट कोहलीने कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कमेंट करताना तीन लव्ह इमोजी पाठवले आहेत. तसेच या पोस्टवर इतर अनेक कलाकारही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List