Zapuk Zupuk Review: सामान्यतेकडून असामान्यत्वाकडे!; काय आहे ‘झापुक झुपूक’ची कथा?
रिल स्टार सूरज चव्हाण हा त्याच्या साधेपणामुळे कायम चर्चेत राहिला आहे. एका छोट्याश्या गावात आई-वडिलांशिवाय मोठा झालेल्या सूरजला बिग बॉस मराठीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोनं केलं. सूरजने बिग बॉस मराठी सिझन ५चा ताज जिंकला. त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित सिनेमा काढण्याची घोषणा केली. ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा २५ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता या सिनेमाची कथा काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
चित्र-विचित्र हावभाव, गळ्यातील शिरा ताणून मोठ्याने ओरडणारा, पण मनाने साधा आणि प्रामाणिक असलेला सूरज (सूरज चव्हाण) हा ‘झपूक झुपूक’ चित्रपटाचा नायक आहे. त्याची अनोखी शैली, बोलण्याचा लहेजा आणि ‘आपल्यापैकी एक’ अशी सहजता हीच त्याच्या या रंगीबेरंगी पात्राची खरी ताकद आहे. सूरजला पाहताना प्रत्येकाला आपल्या आजूबाजूला असलेलं एखादं अस्सल पात्र आठवतं. ‘झपूक झुपूक’ हा चित्रपट फक्त एक कथा नाही, तर सामान्य माणसाच्या असामान्य स्वप्नांचा प्रवास आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
सूरज हा गावातील शाळेत शिपाई म्हणून काम करतो आणि निरक्षर आहे. शाळेत नव्याने शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या सुंदर नारायणी पंजाबराव पाटीलला (जुई भागवत) पाहाताच तिच्या प्रेमात पडतो. पण तिचं नाव घेताना त्याची जीभ अडखळते; ‘नारायणी’चं ‘नानायणी’ होतं. नारायणीसोबत लग्न करण्याचं स्वप्न तो पाहतो, पण तिच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला प्रेमपत्रांचा आधार घ्यावा लागतो. सुशिक्षित आणि चित्रकार असलेला शेखर (इंद्रनील कामत) सूरजसाठी ही प्रेमपत्रे लिहितो.
दरम्यान, नारायणीच्या भूतकाळातील प्रेमकथा रंजकपणे उलगडते. तिच्या जुन्या प्रेमातील धोक्यामुळे ती गाव सोडून मुंबईला शिकायला गेली होती. आता शिक्षिका म्हणून ती गावात परतली आहे. सूरजचं प्रेम नारायणी स्वीकारते की त्याला धोका देते? नारायणीचे वडील, आमदार पंजाबराव पाटील (मिलिंद गवळी), या प्रेमकथेत काय अडथळे आणतात? सूरजची प्रेमपत्रे नारायणीला तिच्या भूतकाळात का घेऊन जातात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यावर रंजक आणि नाट्यमय पद्धतीने उलगडतील.
कलाकरांच्या अभिनयाविषयी
‘झापुक झुपूक’ सिनेमाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटातील दृश्ये ही पटापट डोळ्यासमोरुन जाताना दिसतात. त्यामुळे नेमकं काय सुरु आहे हे कळायला वेळ लागतो. सूरज चव्हाणच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर त्याने त्याच्या भूमिकेत जीव ओतला आहे. त्याच्या विनोदाचे टायमिंग आणि काहीसे भडक बटबटीत व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना आकर्षित करते. तर जुई भागवत पडद्यावर अगदी सहज वावरताना दिसत आहे. केदार शिंदे कायमच त्यांच्या गंभीर आणि गमतीदार कथेच्या मिश्रणासाठी ओळखले जातात. या सिनेमातून देखील त्यांनी सूरजचा संघर्ष आणि त्याच्या अपयशाची कथा साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List