काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी चित्रपटांवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. अलीकडेच त्यांनी सांगितलं की, चित्रपट कोणत्याही विचारधारेचा असला तरी त्यावर बंदी घालणं चुकीचं आहे आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मोठा धोका आहे. प्रकाश राज यांनी स्पष्टपणे सांगितलं, “आजकाल लोकांच्या भावना अगदी छोट्या गोष्टींवर दुखावल्या जात आहेत आणि हे वातावरण धोकादायक आहे.”
कोणत्या चित्रपटांनी केला वादाचा सामना?
प्रकाश यांनी अनेक चित्रपटांचं उदाहरण दिलं, ज्यांना वादांचा सामना करावा लागला. त्यांनी ‘पद्मावत’, ‘पठाण’, ‘एल2: एम्पुरान’ आणि फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटांना केवळ सेंसर बोर्डाच्या कठोरपणाचाच सामना करावा लागला नाही, तर राजकीय दबाव आणि लोकांच्या रागाचाही सामना करावा लागला. ‘अबीर गुलाल’च्या वादावर प्रकाश म्हणाले, “मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालण्याच्या विरोधात आहे, मग तो प्रचार करणारा असला तरी. जोपर्यंत चित्रपट मुलांचं शोषण किंवा अश्लीलता वाढवत नाही, तो का थांबवायचा? लोकांना स्वतः निर्णय घेऊ द्या.”
वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया
पद्मावत आणि पठाणच्या वादाचा उल्लेख
प्रकाश यांनी ‘पद्मावत’ आणि ‘पठाण’च्या वेळी झालेल्या गोंधळाबद्दलही वक्तव्य केले. त्यांनी सांगितलं की, दीपिका पादुकोणला ‘पद्मावत’मधील तिच्या वेशभूषेमुळे आणि ‘पठाण’मधील एका गाण्याच्या रंगामुळे धमक्या मिळाल्या. “लोक म्हणत होते की आम्ही तिचं नाक कापू. हा काय तमाशा आहे, फक्त एका कपड्याच्या किंवा रंगाच्या गोष्टीसाठी?” प्रकाश यांचं म्हणणं आहे की, हा केवळ राग नाही, तर ही एक सुनियोजित रणनीती आहे. त्यांनी सांगितलं, “काही लोक भीतीचं वातावरण निर्माण करू इच्छितात. चित्रपट बनतच नाहीत. सेंसरशिप आता फक्त राज्य स्तरावर नाही, तर केंद्राकडून नियंत्रित केली जात आहे.”
‘एल2: एम्पुरान’ आणि ‘कश्मीर फाइल्स’चं उदाहरण
प्रकाश यांनी अलीकडील ‘एल2: एम्पुरान’ चित्रपटाचं उदाहरण दिलं, ज्याला सेंसर बोर्डाकडून मान्यता मिळाली असूनही 2002 च्या गोधरा दंगलींच्या चित्रणामुळे वादाला सामोरं जावं लागलं. चित्रपटाचा मुख्य अभिनेता मोहनलाल यांना माफी मागावी लागली आणि काही दृश्ये हटवली गेली. दुसरीकडे, त्यांनी ‘कश्मीर फाइल्स’चा उल्लेख करत सांगितलं की, काही चित्रपटांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रदर्शनाची संधी मिळते. पण इतरांना तितकी सहज संधी मिळत नाही. प्रकाश यांनी स्पष्ट सांगितलं की, ही समस्या कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नाही, पण जेव्हा केंद्र सरकार याला प्रोत्साहन देते तेव्हा ती अधिक धोकादायक बनते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List