Deven Bharti – मुंबई पोलिसांचा ‘ब्रॅण्ड’!
>> प्रभाकर पवार
देवेन भारती कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे लागत नाही. मुंबई पोलिसांचा ‘ब्रॅण्ड’ म्हणजे चेहरा म्हणून देवेन भारतींची ओळख निर्माण झाली आहे. संकटकाळी मार्ग काढणारा, राजकारणी आणि पोलीस खात्यात समन्वय साधणारा हा अधिकारी आता मुंबईचा सुपरकॉप म्हणजे ‘कमिशनर’ झाला आहे. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी भारती यांना अनेक प्रसंगांतून तावून सुलाखून बाहेर पडावे लागले. सरकारे बदलत गेली तसे त्यांच्या करीअरमध्ये चढउतार आले. अपमानाचे कडू घोट पचवावे लागले. अनेकदा कमी महत्त्वाच्या जागेवर बसावे लागले. अडगळीत जागा शोधावी लागली. तरीही राजकारणातील प्रत्येक उच्चपदस्थाला ‘भारती’ आपले वाटतात हे त्यांचे यश.
बिहारच्या दरभंगा येथील देवेन भारती यांचे उच्च प्राथमिक शिक्षण झारखंड, तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पार पडले. 1994 साली त्यांची महाराष्ट्र कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. काही काळ जिह्यात काम केल्यावर त्यांची प्रथमच मुंबई गुन्हे शाखेत उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली. मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष व गुन्हे प्रकटीकरण शाखेत तडफदार कामगिरी केल्यानंतर देवेन भारती यांना बढती देऊन त्यांची त्याच शाखेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपायुक्त, अतिरिक्त, सहपोलीस आयुक्त म्हणून काम करणाऱया या अधिकाऱयाने क्राईम ब्रँचमधील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक हायप्रोफाईल व गुंतागुंतीच्या केसेसवर प्रकाश टाकला. प्रथम अंडरवर्ल्ड व त्यानंतर अतिरेक्यांचे त्यांनी कंबरडे मोडले. देशभरात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीनच्या 21 अतिरेक्यांना पुणे येथील कोथरूड येथे छापा मारून (2008 साली) पकडले. त्यानंतर बॉम्बस्फोट मालिका थांबल्या. याचे श्रेय राकेश मारिया व देवेन भारती यांना जाते.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील व अलीकडील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मुंबईची खडान्खडा माहिती असलेल्या देवेन भारती यांनी गुन्हे शाखेत लाजवाब कामगिरी केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कधी निर्माण होऊ दिला नाही. त्यामुळेच देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (2023 साली) नियुक्ती केली असे पोलीस दलात बोलले जात आहे.
विवेक फणसळकर हे बुधवारी निवृत्त झाल्यावर विशेष पोलीस आयुक्त असलेले देवेन भारती यांची मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे 47 वे पोलीस आयुक्त म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली. अशा या हुशार, असामान्य, जनतेशी नाळ जुळलेल्या अधिकाऱयाची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याने तळागाळातील पोलीस वर्गात आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य पोलिसांना भावणारा, त्यांच्याशी सहजपणे संवाद साधणारा, त्यांच्या समस्या जाणून त्यांना मदत करणारा आयुक्त मुंबईला भारती यांच्या रूपाने मिळाला. अंबानी ते सामान्य पीडित व्यक्तीलाही भारती यांच्याविषयी विश्वास वाटतो. या सगळय़ांशी नाते जपताना ‘वर्दी’ची शान आणि स्वतःची आब राखणारे भारती 2028 पर्यंत पोलीस सेवेत राहतील!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List