सीआयएससीईच्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी
कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. दोन्ही परीक्षांमध्ये मुलींची कामगिरी मुलांपेक्षा वरचढ राहिली.
दहावीच्या परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.45 टक्के तर मुलांचे 98.64 टक्के इतके आहे. बारावीच्या परीक्षेतही मुलींनी मुलांना मागे टाकत 99.45 टक्के इतके उत्तीर्णतेचे प्रमाण नोंदवले. तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 98.64 टक्के आहे. दहावी-बारावीच्या सुधारणा परीक्षा जुलैमध्ये होणार आहेत.
दहावीत पश्चिम विभागाची आघाडी
यंदा 2,803 शाळांमधील एकूण 2,52,557 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 2,308 विद्यार्थी नापास झाले. दहावीच्या परीक्षेत पश्चिम विभागाने सर्वोत्तम कामगिरी बजावली. या विभागातील उत्तीर्णतेचा टक्का 99.83 इतका होता. महाराष्ट्र पश्चिम विभागात येतो. त्याखालोखाल दक्षिण विभागाने 99.73 टक्के इतका निकाल नोंदवला.
दहावीत दक्षिण विभाग वरचढ
बारावीच्या परीक्षेत 1,460 कनिष्ठ महाविद्यालयांतून 99,551 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 973 जण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. बारावीचा दक्षिण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.76 टक्के इतका लागला. त्या खालोखाल पश्चिम विभागाचा 99.72 टक्के इतका आहे.
विशेष मुलांची विशेष कामगिरी
डिस्लेक्सियासारख्या शिकण्याच्या अडचणी असलेल्या 1,184 उमेदवारांपैकी 112 जणांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. 48 दृष्टिहीन विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. बारावीची परीक्षा दिलेल्या 257 विशेष विद्यार्थ्यांपैकी 29 जणांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. 17 दृष्टिहीन विद्यार्थ्यांपैकी सहा जणांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले.
मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 92.60 टक्के
निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुलीच्या निकालाची बातमी समाजमाध्यमांवर शेअर केली. मुलगी दिविजा हिने दहावीला 92.60 टक्के गुण मिळविल्याचे त्यांनी जाहीर केले. आज मन खुशीने भरून गेलंय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचे यश
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या 32 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 31 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. शाळेच्या अनुष्का टंडन आणि रिहान सोधानी या दोन विद्यार्थ्यांनी 99.6 टक्के मिळवून अव्वल कामगिरी केली. तर यथार्थ खुराणा आणि जयदित्य गुप्ता यांनी 99 टक्के गुण मिळविले. तर शरण्या बडाला आणि अपूर्व गुप्ता यांनी 98.8 टक्के मिळविले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List