“ब्राह्मणांना टॉयलेट समजून ठेवलंय..”; अनुराग कश्यपवर भडकली अभिनेत्री; FIR दाखल करण्यासाठी पोहोचली पोलिसांत
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ब्राह्मण समाजाविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ब्राह्मणांबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यावरून अनेकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. एकीकडे त्यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आता दुसरीकडे एक अभिनेत्री त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. ही अभिनेत्री गहना वशिष्ठ आहे. ‘गंदी बात’ फेम गहनाने लेखी तक्रार देऊन अनुराग कश्यप यांच्याविरोधत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. “अनुराग यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत वाईट होतं. ब्राह्मणांना टॉयलेट समजून ठेवलंय का? चित्रपटांसाठी तुम्ही काहीही वक्तव्य करणार का? अशी टिप्पणी करताना तुम्ही नशेत होता का”, असा सवाल तिने कश्यप यांना केला आहे.
फक्त गहनाच नाही तर याआधी प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनीसुद्धा कश्यप यांना सुनावलं होतं. “जर तुमची कमाई कमी असेल, तर खर्चावर लगाम लावा आणि जर तुमचं ज्ञान कमी असेल तर शब्दांवर लगाम लावा. अनुराग कश्यप– तुझी कमाई आणि ज्ञान हे दोन्ही कमी आहेत. ब्राह्मणांच्या वारशाची प्रतिमा मलिन करण्याची तुझ्यात एक इंचसुद्धा क्षमता नाही,” अशा शब्दांत त्यांनी फटकारलं होतं.
ब्राह्मणांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अनुराग कश्यप यांनी माफीसुद्धा मागितली होती. कुटुंबीयांना धमक्या येत असल्याने त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित माफी मागितली. “मी माफी मागतो. परंतु ही माफी मी माझ्या पोस्टसाठी नाही तर त्या एका ओळीसाठी मागतोय, ज्याला चुकीच्या पद्धतीने समजलं गेलं आणि द्वेष पसरवला गेला. कोणतंही ॲक्शन किंवा भाषण हे तुमच्या मुलगी, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि ओळखीच्या व्यक्तींपेक्षा मोठं नाही. त्यांना बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. जे स्वत:ला संस्कारी म्हणवतात, तीच लोकं हे सर्व करत आहेत,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.
‘एकदा म्हटलेली गोष्ट परत घेतली जाऊ शकत नाही आणि मी घेणारही नाही. परंतु मला ज्या शिव्या द्यायच्या असतील त्या द्या. माझ्या कुटुंबीयांनी काहीच म्हटलं नाही आणि ते म्हणतही नाहीत. त्यामुळे माझ्याकडून माफी हवी असेल तर ही माझी माफी आहे. ब्राह्मण लोकांनी महिलांना सोडावं, इतके संस्कार तर शास्त्रांमध्येही आहेत, फक्त मनुवादमध्ये नाही. तुम्ही कोणते ब्राह्मण आहात ते ठरवा. बाकी मी माफी मागतो’, असंही त्यांनी म्हटलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List