दिशा पटानीच्या बहिणीचं कौतुक करावं तितकं कमीच; बेवारस बाळासाठी केलेलं काम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
अभिनेत्री दिशा पटानीची मोठी बहीण खुशबू पटानीने एक असं काम केलंय, ज्याची सोशल मीडियावर खूप प्रशंसा होतेय. भारतीय सैन्यातील माजी लेफ्टनंट खुशबूने बरेलीमधील एका नवजात बाळाला वाचवून माणुसकी जपली आहे. तिने रविवारी इन्स्टाग्रामवर अत्यंत भावूक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये पहायला मिळालं की कशा पद्धतीने तिने तिच्या घराजवळ अत्यंत वाईट परिस्थितीत असलेल्या झोपडीत एका लहान बाळाला पाहिलं आणि त्या बाळाला उचलून ती सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. खुशबूच्या धाडसाचं आणि परोपकारी स्वभावाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
खुशबूने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी अत्यंत घाणेरड्या आणि मोडक्या-तोडक्या झोपडीत एकटीत असल्याचं दिसून आलं. खुशबू तिच्याजवळ जाते आणि तिला अलगद उचलून घेते. बाळ रडू लागताच खुशबू तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करते. “घाबरू नकोस, तुझी काळजी घेतली जाईल”, असं ती बाळाला म्हणते. बाळाची काळजी घेतल्यानंतर ती पुढे व्हिडीओत ठणकावून सांगते, “जर तुम्ही बरेलीचे आहात आणि हे बाळ जर तुमचं असेल तर त्या बाळाला तुम्ही अशा परिस्थितीत कसं सोडू शकता? अशा आई-वडिलांना लाज वाटली पाहिजे.” त्याचसोबत बाळाचे काही फोटो शेअर करत तिने तिची ओळख पटवून मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
‘जाको राखे साइयां, मार सके न कोय (ज्याचं देव रक्षण करतो, त्याला कोणीही इजा करू शकत नाही). मला आशा आहे की प्रशासन आणि पोलीस या बाळाची देखरेख करतील. बरेली पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कृपया योग्य नियमांनुसार या बाळाचं संरक्षण करा. आपल्या देशातील मुलींसोबत हे असं कधीपर्यंत होत राहणार आहे? हे बाळ योग्य लोकांच्या हाती जाईल आणि तिचं आयुष्य आनंदी होईल हे मी सुनिश्चित करेन,’ असं तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केलंय.
खुशबूने जपलेल्या या माणुसकीचं नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. ‘ताई तुझ्यावर आणि त्या लहान बाळावर देवाचा आशीर्वाद राहो’, अशी कमेंट खुशबूची बहीण आणि अभिनेत्री दिशा पटानीने केली. तर भूमी पेडणेकरनेही ‘तुला आणि तिला आशीर्वाद मिळो’ असं म्हटलंय. ‘सैनिक नेहमी ड्युटीवर असतो, तुम्हाला सलाम’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी खुशबूची पाट थोपटली आहे.
दिशा आणि खुशबूचे वडील जगदीश सिंह पटानी हे पोलिसांत डीएसपी रेंजचे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रभावामुळेच खुशबूने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं. दिशा जरी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिची बहीण बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून लांबच राहणं पसंत करते. सोशल मीडियावर ती अनेक फिटनेससंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करते. खूशबू आणि दिशाला एक छोटा भाऊसुद्धा आहे. त्याचं नाव सुर्यांश पटानी असं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List