“विविध ठिकाणी घेऊन जाऊन सतत..”; महिलेकडून एजाज खानवर बलात्काराचे आरोप, गुन्हा दाखल
अभिनेता एजाज खानविरोधात एका 30 वर्षीय महिलेनं बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेनं रविवारी मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. फिल्म इंडस्ट्रीत काम देण्याच्या बहाण्याने एजाजने शारीरिक शोषण केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. याप्रकरणी एजाजविरोधात भारतीय न्याय संहितेच्या लैंगिक शोषणाशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. या आरोपांवर अद्याप एजाजने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. “एका 30 वर्षीय महिलेनं नुकतीच एजाज खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. एजाजने तिला चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी मदत करणार असल्याचं सांगून विविध ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण केलं, असा आरोप तिने केला”, असंही पोलीस म्हणाले.
अशा प्रकारे वादात अडकण्याची एजाजची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही दिवसांपासून तो ‘हाऊस अरेस्ट’ या शोमुळेही चर्चेत आहे. ‘उल्लू ॲप’वर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये अश्लील चित्रण दाखवण्याचा आरोप केला जातोय. एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोमधील एक क्लिप व्हायरल झाली. याविरोधात अनेकांनी आवाज उठवला आहे. या गोष्टीची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शोचं प्रसारण बंद करावं आणि संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत.
‘हाऊस अरेस्ट’ या शोच्या व्हायरल क्लिपमध्ये एजाज खान स्पर्धकांना सेक्सचे विविध पोझिशन्स दाखवण्यास सांगतो. जेव्हा स्पर्धकाने सांगितलं की तिला याविषयी फारशी काही माहिती नाही, तेव्हा एजाज तिला म्हणतो, “तू कधी प्रयोग केले नाहीस का?” यावरून नेटकऱ्यांनी या शोवर आणि एजाजवर जोरदार टीका केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित एजाज खानच्या शोवर आक्षेप नोंदवला आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळी सूट देणं बंद केलं पाहिजे. एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोवर तात्काळ बंदी आणा. स्वत:ला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता उघडपणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. उल्लू ॲपसह अशा आक्षेपार्ह कंटेट बनवणाऱ्या सर्व ॲप्सवर तात्काळ बंदी आणावी’, असं त्यांनी लिहिलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List