राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नव्या ट्विटनंतर पुन्हा अशी चर्चा
ठाकरे कुटुंबातील दोन नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह शनिवारी निर्माण झाली होती. राज ठाकरे यांनी युतीसाठी पहिले पाऊल टाकले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याचे स्पष्टच संकेत दिले. एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, आमच्यामधील भांडणे फार लहान आहे. एकत्र येणे, एकत्र राहणे हे कठीण नाही. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठाच्या कामगार मेळाव्यातून राज ठाकरे यांच्या प्रस्तावास सशर्त प्रतिसाद दिला. भाजप आणि शिंदे सेनेसोबत संबंध तोडण्याची अट उद्धव ठाकरे यांनी घातली. परंतु आता संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटनंतर संभ्रम निर्माण झाला आहे.
शनिवारचा दिवस ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा ठरला. राज ठाकरे यांची युतीची तयारी, उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलेला प्रतिसाद, संजय राऊत यांची पत्रकार परिषद त्यानंतर संदीप देशपांडे यांनी मांडलेली वेगळी भूमिका त्यामुळे ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दोन वेळा फसवले असल्याचे म्हटले होते. शिवसेनेने २०१४ आणि २०१७ (मुंबई महापालिका निवडणूक) असा दोन वेळा धोका दिल्याचे संदीप देशपांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा ट्विट केले आहे.
काय आहे ट्विटमध्ये…
संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्रासाठी एकत्र येणे म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे, असे नाही. मराठी, महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरते सुद्धा एकत्र येता येऊ शकते. जसे तामिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामीळ पक्ष एकत्र येतात, तसे मराठी पक्षांनी एकत्र यायला काय हरकत आहे? फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे.
महाराष्ट्रासाठीएकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजेअसं नाही मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकत जसे तामिळनाडू मध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात तसं मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 20, 2025
आणखी एका ट्विटमधून ते म्हणतात, तू एवढ्या जागा लढ. मी एवढ्या लढवतो. तू ही जागा लढव. मी ही जागा लढवतो. तुला हे पद, मला हे पद. इतका मर्यादीत विचार करून चालणार नाही. फक्त निवडणूक एवढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे युतीच्या चर्चा फक्त चर्चाच ठरणार की काय? अशी शक्यता आहे.
तू एव्हढ्या जागा लढव मी एव्हढ्या लढवतो,तू ही जागा लढव मी ही जागा लढवतो,तुला हे पद मला हे पद इतका मर्यादित विचार करून चालणार नाही फक्त निवडणूक एव्हढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 20, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List