लहान मुले श्वसनमार्गाच्या आजारांनी बेजार, पालकांनो, मुलांची काळजी घ्या; बालरोगतज्ज्ञांचे आवाहन
सततच्या पावसामुळे वाढलेली आर्द्रता, साचलेले पाणी, वातावरणातील बदल लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून, सध्या लहान मुलांमध्ये श्वसनमार्गाचे विषाणूजन्य आजार वाढीस लागले आहेत. शालेय मुलांमध्ये ‘फ्लू’ आजाराची तर एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ (आरएसव्ही) या श्वसनसंसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
पावसाळ्यातील वातावरणामुळे सध्या शहरात साथीच्या आजारांबरोबरच डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांनी नागरिकांना बेजार केले आहे. हे वातावरण लहान मुलांच्या आरोग्यासही बाधक ठरत असून, लहान मुलांमध्ये फ्लू, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (आरएसव्ही) हा श्वसनाशी निगडित आजार बळावत असल्याचे दिसून येत आहेत. आरएसव्ही हा संसर्ग मुलांच्या श्वासनलिका व फुप्फुसांवर परिणामकारक ठरत आहे. या आजारांच्या मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप येणे, धाप लागणे, हात-पाय काळे, निळे पडणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने ही मुले या आजाराला बळी पडत आहेत. आरएसव्ही संसर्गाने फुप्फुसावर गंभीर परिणाम झाल्यास मुलांना श्वसनाची समस्या निर्माण होते व अशा मुलांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासू शकते. तसेच आरएसव्हीमधून बरे होण्यासाठी एक किंवा दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या वातावरणात पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये ‘आरएसव्ही’ हा श्वसनाशी निगडित संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, धाप लागणे यासारखी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
– डॉ. प्रमोद जोग, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ
आरएसव्हीची लक्षणे
सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, शिंका येणे, बाप लागणे, बास घेण्यास त्रास होणे.
अशी घ्या काळजी
मुलांना जास्त सर्दी, खोकला उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, मुलाच्या नाकपुड्या वेगाने हालणे, धाप लागणे, झोपेत कण्हणे यासारख्या लक्षणांकडे लक्ष ठेवणे, घरात स्वच्छता राखणे, मुलांना आजारी व्यक्तींपासून दूर ठेवणे, मुलांचे लसीकरण करून घेणे, मुलांना सकस आहार, स्वच्छ व उकळलेले पाणी देणे, मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळणे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List