झारखंडच्या बोकारोमधील नक्षलवादाचा समूळ नायनाट! अमित शहा यांचा मोठा दावा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी झारखंडच्या बोकारोमधून नक्षलवाद पूर्णपणे संपल्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कोब्रा बटालियन आणि झारखंड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर केली. या कारवाईत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले, ज्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
अमित शहा यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, ‘आज, झारखंडच्या हजारीबागमध्ये सीआरपीएफच्या कोब्रा बटालियन आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर सहदेव सोरेन उर्फ परवेश याला ठार करण्यात आले. याव्यतिरिक्त, रघुनाथ हेंब्रम उर्फ चंचळ आणि बीरसेन गंजू उर्फ रामखिलावन या अन्य दोन नक्षलवाद्यांनाही सुरक्षा दलांनी ठार केले आहे’.
‘या कारवाईमुळे, झारखंडच्या उत्तरेकडील बोकारो भागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे. लवकरच, संपूर्ण देश नक्षलवादाच्या समस्येपासून मुक्त होईल’, असेही शहा यांनी पुढे सांगितले.
याआधी, सोमवारी सकाळी, झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एका नक्षलवादी कमांडरला ठार करण्यात आले. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. या कारवाईत आणखी दोन नक्षलवादीही मारले गेले.
पोलिसांनी ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख सहदेव सोरेन अशी केली, जो भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) चा केंद्रीय समिती सदस्य आणि पूर्व हिंदुस्थानातील सर्वात कुख्यात नक्षलवादी नेत्यांपैकी एक होता.
गुप्त माहिती मिळाल्यानंतर, सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनने गिरीडीह आणि हजारीबाग पोलिसांसोबत ही संयुक्त नक्षलविरोधी मोहीम सुरू केली होती. गिरीडीह-बोकारो सीमेजवळील टाटीझरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंडी गावात सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही चकमक झाली.
या कारवाईत मारल्या गेलेल्या इतर दोन नक्षलवाद्यांमध्ये रघुनाथ हेंब्रम उर्फ चंचळ (बिहार-झारखंड विशेष क्षेत्र समितीचा सदस्य, ज्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते) आणि बीरसेन गंजू उर्फ रामखिलावन (झोनल कमिटी सदस्य, ज्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते) यांचा समावेश आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून तिन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List