33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?
३३ वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये राहत असलेल्या ७३ वर्षीय शीख महिला हरजीत कौर यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शीख समुदायात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हरजीतच्या कुटुंबाने आणि समर्थकांनी त्यांच्या सुटकेसाठी निदर्शने केली आहेत. शुक्रवारी हरजीतचे कुटुंब, इंडिव्हिजिबल वेस्ट कॉन्ट्रा कोस्टा काउंटी आणि शीख सेंटर यांनी निदर्शने केली. या निदर्शनात अमेरिकन काँग्रेस सदस्य जॉन गॅरामेंडी, स्थानिक प्रतिनिधी आणि अनेक नेते सहभागी झाले होते. रिपोर्ट्सनुसार हरजीत कौर बर्कले येथील साडी पॅलेसमध्ये बराच काळ शिवणकाम करत होत्या. स्थानिक समुदायात त्यांची ओळख ‘पंजाबी दादी’ अशी होती.
आठवड्याच्या सुरुवातीला इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट (ICE) अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी दरम्यान हरजीत यांना ताब्यात घेतले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बेकर्सफील्ड येथील डिटेंशन सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. हरजीत ३० वर्षांहून अधिक काळ अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियाच्या पूर्वेकडील भागामध्ये वास्तव्यास होत्या. हरजीत एका दशकाहून अधिक काळ नियमित इमिग्रेशन तपासणीचे (जी दर सहा महिन्यांनी होते) पालन करत होत्या. शिवाय त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.
अहवालानुसार हरजीतकडे कोणतेही कागदपत्रे नव्हती. त्या एक बेकायदेशीर स्थलांतरित आहे असे इमिग्रेशन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. १९९२ मध्ये दोन मुलांसह त्या हिंदुस्थानातून अमेरिकेत आलेल्या होत्या. त्यांच्या सून मंजी कौर म्हणाल्या की, २०१२ मध्ये हरजीतचा अर्ज फेटाळण्यात आला होता, परंतु तेव्हापासून त्या १३ वर्षांहून अधिक काळ दर सहा महिन्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील आयसीईला भेट देत आहे.
यावेळी अमेरिकन काॅंग्रेस सदस्य जाॅन गॅरामेंडी म्हणाले, ट्रम्प प्रशासनाने ७३ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. आमचे कार्यालय त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
स्थानिक परिषद सदस्या डिल्ली भट्टाराई म्हणाल्या, त्यांना सीख समुदायाच्या सदस्या म्हणून येथे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण सर्वांनी त्यांची तात्काळ सुटका करावी याकरता मागणी केली पाहिजे. हरजीत यांची नात सुखदीप कौर म्हणाल्या, आम्हाला सर्वांनाच यामुळे धक्का बसला आहे. हरजीतच्या कुटुंबाने त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांना थायरॉईड, मायग्रेन, गुडघेदुखी यासारख्या गंभीर आरोग्य समस्या आहेत. त्यामुळेच तुरूंगात राहणे हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List