Nanded: डॉ. बंसल यांच्या घरातील चोरीचा छडा लागला; तीन आरोपींना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड शहरातील पद्मजा सिटी येथील रहिवासी डॉ. बंसल यांच्या घरात जुलै महिन्यात झालेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा नांदेड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डॉ. बंसल हे 10 ते 14 जुलैदरम्यान आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाली होती. 14 जुलै रोजी ते घरी परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. सुरुवातीला त्यांनी 1 लाख 75 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती, मात्र नंतरच्या तपासणीत त्यांच्या घरातून 21 लाख रुपये रोख आणि 35 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा दोन महिन्यांपासून तपास सुरू केला होता. या तपासानंतर पोलिसांनी शफी बिल्डर, अमीर पाशा आणि नंदू पाटील देवसरकर या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, शफी बिल्डरची 7 लाख रुपयांची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
यातील मुख्य आरोपी शफी बिल्डर हा समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वावरत होता, पण त्याच्यावर यापूर्वीही चार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, आरोपी अमीर पाशाने चोरलेले 15 तोळे सोने एका सोनाराला विकले असून, पोलीस त्या सोनाराचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यातील इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत.
गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस पथकाचे कौतुक केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List