राजापूर तालुक्यातील ओणी–पाचल–अनुस्कुरा मार्गावरील खड्डे सकाळी बुजवले, संध्याकाळी उखडले, ग्रामस्थ संतप्त
राजापूर तालुक्यातील ओणी–पाचल–अणूस्कुरा मार्गावरील खड्ड्यांनी प्रवाशांचे आयुष्य अक्षरशः धोक्यात आणले आहे. रविवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरले आणि संध्याकाळी लगेचच उखडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांत चार वेळा खड्डे बुजवण्याचे काम झाले, मात्र प्रत्येक वेळी केवळ खडी टाकून केलेली मलमपट्टी दोन दिवसातच उखडते. परिणामी चाकरमान्यांना आणि स्थानिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पाचल आणि परिसरातील ग्रामस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून १७ सप्टेंबर रोजी पाचल बाजारपेठेत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी स्वरूपात दिला आहे. या इशाऱ्याची दखल घेत विभागाने घाईगडबडीत पुन्हा खडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. मात्र आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यांची ठाम मागणी आहे की, रस्ता डांबरानेच पक्का करण्यात यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List