साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील, साताऱ्यात 1 ते 4 जानेवारीला संमेलन

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील, साताऱ्यात 1 ते 4 जानेवारीला संमेलन

सातारा येथे होणाऱया 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची आज निवड झाली. संमेलन चार दिवसांचे असून ते 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱयातील शाहू स्टेडियम येथे पार पडेल.

साहित्य महामंडळाची बैठक रविवारी प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र साहित्य परिषदेत झाली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी एकमताने विश्वास पाटील यांची निवड झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत. 99 वे साताऱ्याचे संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही. संस्थांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावातून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱया 99 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सभेत मतदान घेण्याची वेळ आली नाही. अध्यक्षांनाही त्यांचे मत नोंदवावे लागले नाही.

  • साहित्य संमेलन 1, 2, 3 आणि 4 जानेवारी 2026 रोजी साताऱयातील शाहू स्टेडियम येथे होईल.
  • ग्रंथदिंडी संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून त्याच दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शनाचे, कवीकट्टा आणि बालकुमारांसाठीच्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱया दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
  • ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना चार दिवस लाभ घेता येणार आहे. वक्त्यांच्या भाषणांपेक्षा चर्चेतून परिसंवादातील विषयांना न्याय दिला जाणार आहे. निमंत्रितांचे कविसंमेलन, समकालीन गाजलेल्या पुस्तकावरील चर्चा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, नामवंत कादंबरीकारांशी संवाद असे विविध दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत.
  • या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व पूर्वाध्यक्षांना, सरस्वती सन्मानप्रात लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त निवडक लेखकांना तसेच साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे.

युवा पिढीला पुस्तकांच्या जगात नेणार

साहित्यात नवे प्रघात, नवे मापदंड निर्माण करावे, यादृष्टीने माझे प्रयत्न राहतील. त्यासाठी ही एक संधी आहे, असे मी मानतो. आजची युवा पिढी तासन्तास मोबाईलमध्ये अडकली आहे. पुस्तकांपासून दूर गेली आहे. त्यांना पुस्तकांच्या जगात घेऊन जायचं आहे, असे विश्वास पाटील म्हणाले.

मराठी साहित्यातील लोकप्रिय कादंबरीकार

विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱया लिहिल्या आहेत. ‘पानिपत’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. याशिवाय ‘महानायक’, ‘झाडाझडती’, ‘पांगिरा’, ‘चंद्रमुखी’ या त्यांच्या कादंबऱयाही लोकप्रिय आहेत. आपल्या साहित्यिक कार्याबरोबर विश्वास पाटील यांनी प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. ‘पानिपतचे रणांगण’ ही ‘पानिपत’ कादंबरीवर आधारलेली नाटय़कृती 2000 मध्ये रंगभूमीवर आली. देशात व विदेशात या नाटय़कृतीचे 700 प्रयोग झालेले आहेत.

विपुल ग्रंथसंपदा

‘गाभूळलेल्या चंद्रबनात’. ‘नागकेसर’, ‘पानिपत’, ‘पांगिरा’, ‘झाडाझडती’, ‘चंद्रमुखी’, ‘लस्ट फॉर लालबाग’, ‘संभाजी’, ‘क्रांतिसूर्य’, ‘महानायक’, ‘आंबी’, ‘महासम्राट’ – (खंड पहिला-झंझावात), ‘महासम्राट’ – खंड दुसरा ः रणखैंदळ, ‘दुडिया’, ‘पानिपतचे रणांगण’ (नाटक), ‘नॉट गॉन विथ द विंड’.

सातारकर आणि तमाम मराठी वाचकांना मानाचा मुजरा

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद मिळावे, हे प्रत्येक लेखकाचे स्वप्न असते. समस्त सातारकरांनी आणि मराठी वाचकांनी ही संधी मला दिली आहे. सातारा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला मुलुख. साहित्याच्या दृष्टीनेही वेगळा मुलुख आहे. तेथे होणाऱया साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान मला मिळाला. त्यासाठी तमाम जनतेला माझा मानाचा मुजरा अशा शब्दांत विश्वास पाटील यांनी आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका