दिल्ली डायरी – मोदींना मणिपूरची आठवण का झाली?
<<< नीलेश कुलकर्णी >>>
मणिपूरसारख्या संवेदनशील सीमावर्ती राज्यात भयंकर स्थिती असूनही देशाचे प्रमुख म्हणून मोदी आजवर मणिपूरला गेलेले नाहीत. मोदींनी मणिपूरपासून कायमच ‘सुरक्षित अंतर’ राखले होते. मात्र आता मोदींना मणिपूरची ‘उचकी’ लागली आहे. कारण तिथे निवडणुका घेण्याचा सरकारचा मानस आहे. मोदी कोणत्याही राज्याचा दौरा विनाकारण करत नाहीत. त्यामागे राजकीय उद्देशच असतो. त्यांचा मणिपूरचा दौरा होतोय म्हणजे लवकरच तेथे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, असे म्हटले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत 2022मध्ये ‘‘मणिपूर में शांती बहाल होगी… जरूर होगी,’’ असे निवेदन केले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मैतेई व कुकी यांच्यात झालेल्या जातीय हिंसक संघर्षात 250 हून अधिक जणांचा बळी गेला तर सुमारे साठ हजारांवरून अधिक लोक स्थलांतरित झाले. मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांत रक्ताचे पाट वाहिले. आता थोड्या अंशी शांत झालेल्या मणिपूरच्या भेटीसाठी पंतप्रधान मोदी जात आहेत. मणिपूर भेटीचा ‘मुहूर्त’ त्यांना आताच का गवसला हा प्रश्नच आहे. पंतप्रधान नुकतीच चीन वारी करून परतले आहेत. जागतिक राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलीच फटफजिती केल्यामुळे ‘बेसहारा’ झालेले मोदी चीनकडे नवा सहारा शोधण्यासाठी गेले. त्यानंतर ते मणिपूरमध्ये जात आहेत हे विशेष!
गेली पाच वर्षे मणिपूर जातीय संघर्षातून होरपळून निघाले आहे. त्याच्या जखमा अंगावर घेऊन मणिपूरमधले जनजीवन कसेबसे सुरू आहे. भाजपाच्या मुख्यमंत्री बनलेल्या बिरेनसिंग यांच्या कार्यकाळात मणिपूरची पुरती वाट लागली. त्यानंतर लोकलज्जेस्तव त्यांना हटवून राष्ट्रपती राजवट तिथे लागू करण्यात आली. माजी केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत मणिपूरच्या परिस्थितीत सुधारणा जरूर आहेत. मात्र जखमा भरलेल्या नाहीत त्याचे काय? ‘मणूपर में शांती बहाल होगी’ हे पंतप्रधानांचे आश्वासन इतर आश्वासनांप्रमाणेच हवेत विरले. मणिपूरमधल्या जातीय संघर्षाकडे नुसते जातीच्या चष्म्यातून पाहता येणार नाही. मणिपूरमध्ये मोठा खनिजसाठा आहे. मणिपूरमधून मैतेई व कुकी या जातींचे उच्चाटन झाल्यानंतर ही खनिज संपदा आपल्या आवडत्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा केंद्रीय सरकारचा डाव आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळेच जळत्या मणिपूरकडे दिल्लीतले सरकार मख्खपणे पाहत राहिले. आता निवडणुका घेऊन आपल्या मर्जीचे सरकार सत्तेवर आणले की पुढे लाडक्या उद्योगपतीला पायघड्या घालणे सोपे होणार आहे. त्यामुळे ही निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मोदी मणिपूरला जातील ‘मणिपूर से मेरा बचपन से गहरा नाता है’ वगैरे बोलतील. मात्र त्यामुळे मणिपूरमधला जातीय दुभंग शमेल काय, मणिपूरमध्ये येण्यास इतका उशीर का झाला, याचा जाब मणिपूरमधील जनतेने पंतप्रधानांना विचारायला हवा. मणिपूरच्या दंगलीची खडान्खडा माहिती असल्याने माजी मुख्यमंत्री बिरेन सिंग हे भाजप हायकमांडला ब्लॅकमेल करत असल्याचीही चर्चा आहे. बघूयात मोदींच्या मणिपूर दौऱ्याने काय साधले जाते ते.
दिल्ली तुंबली
देशाची राजधानी दिल्ली सध्या पाण्यात तरंगते आहे आणि मायबाप सरकार बिहारमध्ये प्रचारसभांमध्ये घसा साफ करत आहे. अतिवृष्टीमुळे पंजाबमध्ये अभूतपूर्व स्थिती आहे. शेजारच्या हरियाणातही पूरस्थिती आहे. या दोन्ही राज्यांतून येऊन यमुना दिल्लीमधून पुढे जाते. सध्या यमुनेचा जलस्तर वाढलेला आहे आणि दिल्लीतील ऐतिहासिक अशा ‘लोहा पुला’ला पाण्याने स्पर्श केल्याने दिल्लीकरांच्या मनात धडकी भरलेली आहे. एरव्ही यमुनेच्या वाढलेल्या पाण्यासाठी पंडित नेहरू किंवा आम आदमी पार्टीला जबाबदार ठरवताही आले असते. मात्र दिल्ली या राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे दूषण कोणाला द्यायचे? मुंबईत थोडाफार पाऊस झाला की ‘म्बुंई की तुंबई’ असा सवाल विचारला जातो. मात्र पायाभूत सुविधा व पाण्याच्या निचऱयाच्या बाबतीत मुंबई दिल्लीपेक्षा शेकडो मैल पुढे आहे हे या पावसाने दाखवून दिले. ‘ल्युटन झोन’ हा दिल्लीतला व्हीयआयपी मंडळीचा एरिया. सगळी प्रशासकीय कार्यालये इथेच. खासदार, मंत्री, पंतप्रधानांचे निवासस्थानही याच परिसरात आहे. सध्या इथे ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती आहे. व्हीआयपी परिसरात ही स्थिती असेल तर सामान्य दिल्लीकरांची काय अवस्था असेल याची कल्पनाच केलेली बरी! एवढी भीषण परिस्थिती असताना ती आटोक्यात आणण्यासाठी भाजप सरकार काही करत नाही. सत्ताधारी निर्धास्त आणि दिल्लीकर भयग्रस्त अशी स्थिती आहे.
आमदार अझरुद्दीन
क्लासिक फ्लिक मारणारे माजी क्रिकेटपटू महंमद अझरुद्दीन यांनी पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. अर्थात हे कमबॅक क्रिकेटमध्ये नाही तर राजकारणाच्या ग्राऊंडवर केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अझर यांना विधान परिषदेचे आमदार बनवले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा अझरुद्दीन यांचाही राजकीय वनवास संपुष्टात आला आहे. मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर व त्यात दोषी आढळल्यानंतर अझरुद्दीन यांची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली होती. मात्र काँग्रेसने अझरुद्दीनला 2009मध्ये लोकसभेसाठी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून मैदानात उतरवले व अझर महाशय खासदार बनले. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत अझरुद्दीनला अपयशच आले. गेल्या निवडणुकीत त्यांनी ओवेसींविरोधात निवडणूक लढवली होती. तेथेही पदरी अपयश पडले. क्रिकेट, राजकारण व काँग्रेसपासून शेकडो मैल दूर गेलेल्या अझरुद्दीन यांचे रेवंत रेड्डी यांनी राजकीय पुनर्वसन केले आहे. त्यामागची दोन प्रमुख कारणे म्हणजे एकतर अझर त्यांचा चांगला मित्र आहे. शिवाय त्याच्या नेमणुकीमुळे मुस्लिम समाजात चांगला संदेश जाईल, असा भरवसा रेड्डी यांना वाटतो आहे. त्यामुळे अझरची नेमणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली असली तरी आपण नुसते अझरला आमदार करून थांबणार नाही तर त्याला मंत्रीही बनवू, अशी घोषणाच रेवंत रेड्डी यांनी केली आहे. अझरुद्दीनची नवी इनिंग किती निर्धोक व निर्दोष पार पडते ते दिसेलच!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List