विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!
<<< विनायक >>>
दिवस गणेशोत्सवाचे. विविध प्रकारच्या मखरांची आरास घरच्या आणि सार्वजनिक गणपतींसाठी सजली असेल. पूर्वी घरच्या गणपतीची आरास घरीच व्हायची. कार्डबोर्डची कमान आणि मागे आरसा असंच साधारण त्या मखराचे रूप असाचये. आता ठिकठिकाणी तयार मखरं मिळतात. शहरी गडबडीच्या जीवनात, विविध कलाकारांनी कल्पकतेने बनवलेली ही आरास उपयुक्त ठरते. या काळात आणखी ज्या गोष्टींना मागणी असते ती म्हणजे विविधरंगी फुले, पत्री (पानं) आणि हिरव्यागार दुर्वा, बेलपत्र तसेच शमीची बारीक पानं.
यामध्ये नजरेत चटकन भरणारे फूल जास्वंदीचे. गुलाबी, लाल आणि क्वचित पिवळ्या निळ्या रंगांची तुरे मिरवणारी ही फुले खूपच मोहक दिसतात. तसे जास्वंद हे बारमाही फूल आहे. गणेशवेलीवरच्या लालचुटूक फुलासारखे नाजूक आणि मोसमी नाही, परंतु त्याचा डौलच निराळा. भरपूर उंच वाढणाऱ्या कातरलेल्या, हिरव्या पानांची नक्षी मिरवणाऱ्या, मोठे झुडूप वाटावं अशा झाडांवर जास्वंदीच्या शेकडो कळ्या एकाच वेळी दिसतात. थोडीशी मोठी कळी रात्रभर पाण्यात ठेवली तरी फुलते, पण झाडावर डौलाने डोलणाऱ्या जास्वंदीची मोहकता वेगळीच.
आमच्या मुंबईतल्या घरापुढच्या अंगणातही जास्वंदीचे मोठे झाड होते. विशेष म्हणजे ही दुपदरी (डबल) जास्वंद होती. एकाच वेळी अनेक फुलांनी फुलारलेले हे झाड फार सुंदर दिसायचे. बाकी जिथे अजूनही घरांना आंगण आहे तिथे जास्वंदीची झाडं दिसतातच. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात वाढणारे हे झाड महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. ‘जीनस’ प्रकारातली अशी फुलझाडे केवळ जास्वंदच नव्हे तर अनेक प्रकारची असतात आणि आपल्या देशात तर ठिकठिकाणी पाहायला मिळतात. जगातही बहुतेक देशात जास्वंदीचे फूल आढळते, परंतु विषुवृत्ताजवळच्या प्रदेशात अधिक प्रमाणात दिसते. इंग्लिशमध्ये जास्वंदीला ‘हिबिस्कस’ किंवा ‘रोज मेलो’ असे म्हटले जाते.
या फुलांच्या मोठ्या आकारामुळे आणि त्यातील सुंदर तंतुमय तुऱ्यामुळे त्याला ‘शोइ फ्लावर’ किंवा देखणे फूल असेही योग्य नाव आहे. म्हणून या फुलाला छोट्या हाराच्या मधोमध आणि दोन्ही टोकांना महत्त्वाची जागा मिळते. गुलाबाचे फूल अर्थातच अधिक सुंदर, पण वर्षभर सहज उपलब्ध आणि तुलनेने स्वस्त असलेल्या या फुलाला फूल बाजारात भरपूर मागणी असते.
जास्वंदीच्या पाकळ्या बारकाईने पाहिल्या तर त्या एकामागोमाग एक उमललेल्या आणि तुऱ्याभोवती अंतर्गोल आकारात वाढलेल्या दिसतील. त्यांचा पृष्ठभाग मखमली असतो. कानाच्या पाळं असावं तसा या तळाशी एकात एक गुंफलेल्या खोलगट पाकळ्या उमलल्यावर मोठा आकार धारण करतात. त्या ‘ट्रम्पेट’ वाद्याच्या कर्ण्यासारख्या दिसतात. एका फुलात बहुधा पाच पाकळ्या येतात. काही वेळा जास्त. ‘डबल’ जास्वंदाच्या पाकळ्या अधिक गच्च असतात.
जास्वंदीच्या तुऱ्यात त्याच्या बियांचा संच असतो. वाऱ्याबरोबर हे परागकण उडून इतरत्र रुजतात आणि नवं रोप उगवतं. लाल रंगाची जास्वंद सर्वत्र आढळते, परंतु घरी गॅलरीत लावण्यासाठी पिवळी, निळी, नारंगी, पांढरी फुलं देणारी रोपंही नर्सरीत मिळतात.
आपल्याकडे पूर्वापार जास्वंदीच्या फुलाची माहिती नोंदलेली आहे. जास्वंदीचं संस्कृत नाव जपाकुसूम किंवा जपापुष्प असे असून जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, हरिवल्लभ, अरणा, जासुम अशा अनेक नावांनी हे फूल देशभरात ओळखले जाते.
जास्वंदीची फुले आणि पाने हार किंवा आरास करण्यासाठी वापरात येतात. त्याचप्रमाणे आयुर्वेदात त्याचे बरेच औषधी उपयोगही सांगितले आहेत. त्यापैकी केसांच्या वाढीसाठी ते बऱ्याच औषधात वापरले जाते, मात्र अशा औषधांचा वापर वैद्यकीय चिकित्सेनंतरच करणे योग्य.
जास्वंदीचे फूल सुंदर दिसते आणि झाड जलदही वाढते. जगात सर्वत्र आढळणाऱ्या या फुलात ‘डिबिस्कस स्प्लेन्डेन्स’ या प्रजातीचे झाड वेगाने वाढून भरपूर फुलांनी बहरते, मात्र या प्रकारची जास्वंद केवळ ऑस्ट्रेलियामध्येच दिसते. चार्ल्स फ्रेझर यांनी 1928 मध्ये ‘स्लेन्डेन्स’चे निरीक्षण करून त्याला ऑस्ट्रेलियातील फुलांचा राजा असे म्हटले होते.
जास्वंदीच्या फुलाला हवाई देशाचे राष्ट्रीय फूल होण्याचाही सन्मान प्राप्त झाला आहे, मात्र ते जास्वंदीचे पिवळे फूल आहे. हवाईमध्ये पिवळी जास्वंद सर्वत्र होते आणि तिथल्या लोकांचे ते परंपरेने अत्यंत आवडते फूल असल्याने त्याला तिथे राष्ट्रीय फुलाचा गौरव लाभला आहे.
हार्डी हिबिस्कस प्रकारची जास्वंद कडक उन्हातही वाढते. एरव्ही इतर प्रकारच्या जास्वंदीच्या झाडांना समशीतोष्ण हवामानच अधिक मानवते. रोप उगवल्यापासून साधारण सहा-सात महिन्यांत त्याला छान फुले येऊ लागतात आणि ते सुमारे 20 वर्षे डौलदार, तुर्रेबाज फुलांनी बहरते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List