मराठा आंदोलकांच्या सोयीसुविधांसाठी शिवसेना धावली
मराठा आरक्षण आंदोलनासाठी लाखो मराठी बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आले आहेत. त्यांची संख्या मोठी असल्याने पाणी व अन्य सुविधांची गैरसोय होत होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची तातडीने दखल घेत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना आंदोलकांना सोयीसुविधांसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व शिवसेनेच्या इतर खासदारांनी मनोज जरांगे यांची आझाद मैदानात भेट घेऊन मराठा आंदोलकांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा तातडीने पुरवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पालिकेने आंदोलकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, शौचालये, स्वच्छता, धूम्रफवारणी, वैद्यकीय सुविधा यांची तातडीने व्यवस्था केली. विविध विभागांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही आंदोलकांना पिण्याचे पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली.
शिंदे समितीला चर्चेचा अधिकारच नाही…
सरकारने चर्चेसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला पाठवल्याबद्दल मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. शिंदे समितीला चर्चेचा अधिकारच नाही…आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती किंवा मंत्र्यांनी थेट चर्चा करायला हवी होती. पण तसे झाले नाही, असे जरांगे म्हणाले. सरकारला मराठा समाजाबरोबर चर्चा करण्यास तोंड उरले नाही अशी टीका त्यांनी केली.
जरांगे यांच्या मागण्या…
हैदराबाद आणि सातारा संस्थांचे गॅझेटिअर लागू करावे
आंदोलनात बलिदान दिलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबियांना दहा लाखांची तातडीची मदत द्या.
मुंबई सरकार आणि औंध संस्थांनच्या गॅजेटचाही अभ्यास करून शिंदे समितीने कुणबी नोंदी काढाव्यात.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा हा कुणबीच आहे, असे गृहीत धरून उद्यापासून प्रमाणपत्राचे वाटप करावे.
मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय तातडीने काढा.
मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्या.
मराठा आंदोलकांना मारहाण करणाया पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List