ठाण्यातील अतिधोकादायक 37 इमारती तत्काळ रिकाम्या करा, विरारमधील ‘रमाबाई अपार्टमेंट’च्या दुर्घटनेनंतर ठाणे पालिका अलर्ट
विरारमधील ‘रमाबाई अपार्टमेंट’ ही इमारत कोसळून 17 जणांचा जीव गेल्यानंतर ठाणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. ठाण्यातील 37 अतिधोकादायक इमारतीदेखील डेंजर झोनमध्ये असून या इमारती तत्काळ रिकाम्या करा, असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले आहेत. तेथे वास्तव्य करीत असलेल्या 191 कुटुंबांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधून त्यांना धोक्याची कल्पना द्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे ऐन सणासुदीच्या काळात जायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा ठाकला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 93 अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी 56 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित 37 इमारतींमध्ये एकूण 191 कुटुंबे वास्तव्यास आहेत. पावसाळ्यापूर्वीपासून परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त या रहिवाशांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करीत आहेत. महापालिका या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडेही देणार नाही. त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील, याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असेही आयुक्त राव यांनी पुन्हा नमूद केले आहे.
संवाद साधा
विरारमधील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला. शुक्रवारी झालेल्या या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी, अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना द्यावी असे सांगितले. या धोकादायक इमारती रिक्त करून ज्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
महापालिका क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचे फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते. ते फलक पुन्हा लावण्यात येणार आहेत.
धोकादायक इमारती कोणत्या प्रकारचे संकेत देतात याची माहिती घरोघरी पत्रकाद्वारे दिली जावी, असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले.
रहिवाशांचे व्हॉट्सअॅप ग्रुप करून त्यावर सर्व माहिती दिली जाणार आहे. इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List