देशात एचआयव्ही रुग्णसंख्या सर्वाधिक मिझोरममध्ये; 5 वर्षांत 2,996 जणांचा मृत्यू, 11 हजार नवे रुग्ण
मिझोरममध्ये 2020 ते जुलै 2025 या कालावधीत एचआयव्हीची लागण झालेल्यांपैकी 2 हजार 996 जणांचा मृत्यू झाला असून, याच काळात 11 हजार 32 नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री लालरिनपूई यांनी शनिवारी दिली.
ऐज्वाल जिल्ह्यात एचआयव्ही लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून ती 11 हजार 128 आहे. तर हनथियाल जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 284 रुग्ण आहेत. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार चम्फाईत 1,725, खावझॉलमध्ये 437, कोलासिबमध्ये 1,502, लॉंगतलाईत 749, लुंगलेईत 1,324, मामितमध्ये 697, साइटूआलमध्ये 469, सेर्चीपमध्ये 818 आणि सियाहामध्ये 704 रुग्ण आढळले आहेत.
सध्या 18,694 रुग्णांना अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) दिली जात असून 1,143 जणांवर अजून उपचार सुरू झालेले नाहीत. मिझोरममध्ये सातत्याने एचआयव्हीची लागण होण्याचा दर देशात सर्वाधिक नोंदवला जातो. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंमली पदार्थांचे व्यसन (विशेषतः इंजेक्शनद्वारे घेतले जाणारे ड्रग्स), असुरक्षित लैंगिक संबंध, तसेच आंतरराष्ट्रीय सीमेजवळील राज्याचे स्थान या कारणांमुळे अंमली पदार्थांची तस्करी व त्यासंबंधित धोके वाढतात आणि त्यामुळे एचआयव्हीचा प्रसारही मोठ्या प्रमाणात होतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List