खाऊगल्ली – भटक्या मुंबईकरांचा खादाड कट्टा

खाऊगल्ली – भटक्या मुंबईकरांचा खादाड कट्टा

>> संजीव साबडे

जिप्सी म्हटलं की, अनेकांना ते काहीसं महाग मोठं वाटणारं चायनीज रेस्टॉरंट आठवेल. ते तर  उत्तम आहेच. पण त्याच्या अगदी बाजूलाच रोज मराठी खाद्यपदार्थांचा महोत्सव भरतो. महोत्सव का तर तिथे असंख्य मराठी प्रकार खायला मिळतात. त्याचं नावही जिप्सी आहे, पण एका बाजूला असल्याने ते आहे जिप्सी कॉर्नर!

दादरच्या पश्चिमेची मुंबई जणू मराठी सांस्कृतिक राजधानीच. शिवाजी पार्क, शिवाजी मंदिर, यशवंत नाटय़ मंदिर, दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, बालमोहन शाळा, सानेगुरुजी विद्यालय, शिवसेना भवन या संस्था व वास्तू, टिळक पूल, सेनापती बापट मार्ग, गोखले रोड, केळुस्कर मार्ग, रानडे रोड, डी. एल. वैद्य रोड, न. चिं. केळकर मार्ग, सावरकर मार्ग, सी. के. बोले पथ, जे. के. सावंत मार्ग, मधुकर राऊत मार्ग असा मराठीचा प्रभाव दादरच्या पश्चिमेला नक्की जाणवतो. तुम्ही दादर, शिवाजी पार्कमध्ये मराठी ऐकता, बोलता आणि असंख्य फलकही मराठीतले पाहायला मिळतात. शिवाजी पार्क म्हणजे मराठी नाटक-चित्रपट व मालिकांतील कलाकारांचं येण्या-फिरण्याचं ठिकाण. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर अशा अनेकांची क्रिकेटची सुरुवात शिवाजी पार्कमधूनच झाली.

याच मैदानावर आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, जयप्रकाश नारायण, बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, दत्ता सामंत, जॉर्ज फर्नांडिस, मोरारजी देसाई, सोनिया गांधी, राहुल गांधी, राज ठाकरे आदी नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. या शिवाजी पार्कसमोरच असलेल्या शिवसेना भवनातून शिवसेनाप्रमुखांनी राज्यातील पहिल्या बिगरकाँग्रेस सरकारसाठी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली होती. शिरीष कणेकर, द्वारकानाथ संझगिरी अशा क्रीडाप्रेमी आणि उत्तम लेखकांचा वॉक शिवाजी पार्कवर नेहमी सुरू असायचा. दादर भागातील अनेक मराठी कलाकारही तिथे सकाळ-संध्याकाळी फिरताना वा गप्पा मारताना दिसतात.

त्यामुळे दादर, त्यातही प्रामुख्याने शिवाजी पार्कच्या परिसरात फिरताना मस्त वाटतं. तिथेच आस्वाद, तांबे, पणशीकर, मामा काणे, प्रकाश, तृप्त पोटोबा, एकादशी, महाराष्ट्राची खाद्यजत्रा अशी अनेक मराठी शाकाहारी आणि असंख्य मांसाहारी ठिकाणं आहेत. मुख्य म्हणजे इथे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळणारं एक उत्तम ठिकाण म्हणजे शिवाजी पार्कच्या अगदी जवळ असलेलं जिप्सी. जिप्सी म्हटलं की, अनेकांना ते मोठं व काहीसं महाग वाटणारं चायनीज रेस्टॉरंट आठवेल. ते तर अतिशय उत्तम आहेच. त्याच्या अगदी बाजूलाच रोज मराठी खाद्यपदार्थांचा महोत्सव भरतो. महोत्सव म्हणायचं कारण तिथे असंख्य मराठी प्रकार खायला मिळतात. त्याचं नावही जिप्सी आहे, पण एका बाजूला असल्याने ते आहे जिप्सी कॉर्नर!

या जिप्सी कॉर्नरमध्ये असे काही खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ मिळतात, जे मुंबईत अन्यत्र मिळतच नाहीत. पोहे, बटाटेवडा, पुरी व सुकी भाजी, भाजी पाव, साबुदाणा वडा, खिचडी, अळूवडी, कोथिंबीर वडी, कांदा भाजी, पट्टी सामोसा, वाटाणा पॅटिस, मोदक हे प्रकार तर सर्वच ठिकाणी मिळतात. शिवाजी पार्क परिसरातील आस्वाद, प्रकाश, एकादशी आदी रेस्टॉरंटमध्ये. पण जिप्सीमध्ये तिखट मिठाच्या पुऱ्या, पालकच्या पुऱ्या, हिरव्या वाटाण्याच्या करंज्या, घावणे-चटणी हेही प्रकार मस्त मिळतात. भेळ आणि इतर चाट प्रकार हेही असतात. याशिवाय अनेक दक्षिण भारतीय पदार्थ तसेच सुरती कढी वडा वगैरे अन्य प्रकारही मिळतात.

पण जिप्सीची खासियत म्हणजे अळूची पातळ भाजी, डाळिंबी उसळ, मटकीची उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, वाटाणे-काजूची उसळही इथल्या मेन्यूमध्ये आहे. विशेष म्हणजे फणसाची घरगुती भाजी, मेथीची पळीवाढी भाजी (म्हणजे काहीशी पातळ, जी पूर्वी पळीने वाढली जाई), तोंडली-काजूची भाजी, हिरव्या मिरच्यांचा ताजा ठेचा, पडवळ-डाळिंबी, अंबाडीची भाजी, भरली वांगी, वांग्याचं भरीत, पिठलं, झुणका, भाकरी, साधं वरणभात-तूप, आमटी भात तूप, मेतकूट भात व तूप, मुगाची खिचडी व कढी, मसालेभात, फणसाची बिर्याणी हे सारे खास मराठी घरगुती प्रकार मिळतात. आपल्याकडे वरणफळं वा दाल ढोकली करतात. इथे दाल ढोकलीही मिळते. पूर्वी घरोघरी जे पदार्थ केले जात, ते हल्ली क्वचित केले जातात. त्यामुळे इथे मुलाबाळांना घेऊन गेलं की, आपल्या पदार्थांची ओळख होईल.

संक्रांतीच्या काळात भोगीची भाजी आणि तो विशिष्ट पुलावही जिप्सीमध्ये मिळतो. कैरी बाजारात आली की, आंबे डाळ असते आणि कोकणातून हापूस आंबे येऊ लागले की, त्यांचा आमरसही असतो. उपवासासाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे सर्वत्र मिळतात, पण इथे वरीची भगर आणि शेंगदाण्याची आमटी असा विशेष बेत असतो. उपवासाची बटाटा भाजी, फराळी मिसळ आणि थालीपीठ, राजगिऱ्याच्या पुऱ्या हेही असतात आणि विशेष म्हणजे त्या दिवशी शिंगाडय़ाचा शिराही असतो. शिंगाडय़ाचा शिरा-कढी बहुसंख्य लोकांनी घरी केला नसेल वा खाल्लाही नसेल.

नुसते वेगळे पदार्थ आहेत असं नव्हे, ते चवीलाही खूप मस्त आहेत. झुणका भाकर आणि ठेचा मागवलात तर सोबत दही लागतंच. ठेचा सहज खाताच येत नाही. घावणे घेतले तर सोबतीला चटणी असली तरी काळ्या वाटाण्याची उसळही साथीला हवी. डाळ ढोकलीवर तूप हवं आणि ती खाऊन झाल्यावर मेतकूट भात अवश्य खावा. हल्ली अनेकांना मेतकूट माहीतच नसतं. पूर्वी घरात भाजी केली नसेल तर मेतकूटावर गोडा मसाला, थोडं तिखट आणि तेल घालून भाकरीसाह खाल्ला जायचा. काही घरांत तर वेगळ्या चवीसाठी आमटी वा भाजीमध्ये मेतकूट घातलं जातं. इथला मसालेभात आणि काजू-वाटाण्याची उसळ मस्त. अळूची अंबाडीची, मेथीची भाजी तर खासच. हो, पण यांचा मेन्यू इथे संपत नाही. इडली, डोसापासून, छोलेपर्यंत सारं या कॉर्नरमध्ये मिळू शकतं. शिवाय गोड प्रकारांमधील अनेक मस्त पर्यायही जिप्सीमध्ये आहेत. सुमारे 46 वर्षांपूर्वी सुरू झालेला खादाड भटक्यांचा अड्डा नक्कीच आवडणारा आहे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?