जे जे या महाराष्ट्राचे शत्रू व दिल्लीचे चपरासी आहेत त्यांना आम्ही पाण्यात पाहतो व त्यांना तळाशी नेणार; संजय राऊत यांचा घणाघात
‘हो पाहतो आम्ही मिंधेंना पाण्यात. आमचं शत्रुत्व या टोकाचं आहे. जे जे या महाराष्ट्राचे शत्रू व दिल्लीचे चपरासी आहेत त्यांना आम्ही पाण्यात पाहतो व त्यांना तळाशी नेणार”, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मिंधे व भाजपवर घणाघात केला.
जनसुरक्षा विधेयकावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयकाचा क्रूर निर्घृण राक्षस उभा केला आहे. जंगलात आदिवासी भागात काम करणाऱ्या संघटना, दलितांसाठी काम करणाऱ्या संघटनांना वेसण घालण्यासाठी हे विधेयक आणलं आहे. जिथे सरकार पोहचत नाही, जिथे संघाचं वनवासी डिपार्टमेंट पोहचत नाही, तिथे या संघटना पोहचतात. ही पोटदुखी आहे. त्यामुळे या संघटनांना अर्बन नक्षलवादी, शहरी नक्षलवादी, दहशतवादी ठरवायचं आणि त्यांच्यावर कारवाया करायच्या. एकेकाळी मिसा कायदा आणला होता.आणि मिसामुळे आणिबाणी बदनाम झाली. या कायद्यामुळे ज्यांना अटका झाल्या ते बहुसंख्य गुंड स्मगलर डाकू अशा प्रकारची लोकं होती. नंतर टाडा आला. लहान लहान गुन्ह्यामध्ये टाडा लावून राजकीय कार्यकर्तायंचं खच्चीकरण करण्यात आलं. आता जनसुरक्षा कायदा आणला. जनसुरक्षा म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांवर बंदी आणणं असं होत नाही. अनेक सामाजिक संस्थांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. फडणवीसांनी पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केला. मंजूर केला असला तरी विरोधी पक्ष या कायद्याला विरोध करणार. आजही आदिवासी पाड्यांवर हॉस्पिटल नाही. गरोदर महिलांना झोळीतून न्यावं लागतं, रस्त्यात त्या प्रसूत होतात. अनेकदा मुलांची प्रेत खांद्यावरून पालक वाहतायत हे आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्या सुरक्षेचं काय? या कायद्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी कालच स्पष्ट केलं की हा जनसुरक्षा नसून भाजपा सुरक्षा कायदा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी शुक्रवारी मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी तो व्हिडीओ प्रसिद्ध करण्याआधी मीडियाच्या माध्यमातून तो सर्वत्र आला होता. एक मंत्री आक्षेपार्ह स्थितीत बसला आहे, बाजूला पैशाच्या बॅगा आहेत. काही बॅगा कपाटात आहेत. असे त्या व्हिडीओत दिसतक आहे. तुम्ही जन सुरक्षा कायदा आणला आहे का? मग मी जनहितासाठी हा व्हिडीओ शेअर केला त्यात कुणाची बेअब्रू होण्याचं कारण नाही. मी तो व्हिडीओ काढला आहे का? त्या व्हिडीओवर त्यांनी खुलासा दिला आहे की ते घर त्यांचंच आहे. संजय शिरसाट हे अतिविशेष व्यक्ती आहेत. ते संत आहेत महात्मा आहेत. त्याचे पुरावे आम्ही समोर आणले असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा चौकशी केली पाहिजे. ते करणार आहेत का? एक मंत्री पैशांच्या बॅगासह बसला आहे, सिगारेटचे झुरके मारत. हे चित्र आमचं नाही. ही महाराष्ट्राची प्रतिमा आहे. भाजप फडणवीसांच्या नेतृत्वाखाली घटिया दर्जाचं सरकार चालवलं जातंय ते मिंधे गटाच्या मंत्र्यांनी दाखवून दिलंय. त्यावर फडणवीस काही बोलत का नाही? मोदी नैतिकतेचे धडे देतात ना मग तुम्ही प्रधानमंत्री मोदींचा तरी आदर्श पाळा, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List