जेसिकाचा सलामीलाच गेम फिनिश; इटलीच्या एलिसाबेटाने सरळ सेटमध्ये हरविले
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली अमेरिकन टेनिसपटू जेसिका पेगुलाचा विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या सलामीलाच गेम फिनिश झाला. 116व्या मानांकित इटलीच्या एलिसाबेटा कोसियारेटाने तिला 6-2, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत मोठी खळबळ उडवून दिली.
पेगुलाचे मागील पाच वर्षांत ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात येण्याची ही पहिलीच वेळ होय. याआधी तिला 2020 मधील फ्रेंच ओपनमध्ये पहिल्या फेरीत हार मानावी लागली होती. विम्बल्डनपूर्वी पेगुलाने जर्मनीतील बॅड होम्बुर्ग ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. अंतिम फेरीत तिने जगातील अव्वल क्रमांकाच्या इगा स्वियाटेकला सरळ सेटमध्ये पराभूत करत शानदार फॉर्म दाखवला होता.
मात्र, विम्बल्डनमध्ये तिला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. एलिसाबेटाने आपल्या विजयाबद्दल बोलताना सांगितले की, ‘मी निकालाची चिंता न करता आक्रमक खेळावर भर दिला. पेगुला एक चॅम्पियन खेळाडू आहे. आम्हा सर्वांसाठी एक आदर्श आहे. त्यामुळे या महान खेळाडूविरुद्धचा विजय नक्कीच मनोधैर्य उंचावणारा आहे.’
2023 मध्ये विम्बल्डनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या पेगुलाने या सामन्यात केवळ पाच विनर्स मारले, तर 24 टाळता येण्याजोग्या चुका केल्या. विम्बल्डनमध्ये पहिल्या फेरीत पेगुलाचा याआधी फक्त 2019 मध्ये तिच्या पदार्पणाच्या वेळी पराभव झाला होता.
सिनरचा विजयारंभ; मुसेट्टी पराभूत
पुरुष एकेरीमध्ये अव्वल मानांकित इटलीच्या यानिक सिनरने आपलाच देशसहकारी लुका नार्डीचा 6-4, 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत आपल्या विम्बल्डन मोहिमेला प्रारंभ केला. सिनरने ही लढत 1 तास 48 मिनिटांत जिंकली. मात्र, लॉरेन्झो मुसेटी या सातव्या मानांकित इटालियन खेळाडूचे पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. 126व्या मानांकित जॉर्जियाच्या निकोलोझ बासिलॅशविलने त्याचा प्रतिकार 6-2, 6-4, 7-5, 6-1 असा मोडून काढला. ही लढत 2 तास 25 मिनिटांपर्यंत रंगली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List