सांगली-कोल्हापूर महामार्ग ठप्प, वाहनांच्या रांगा; अंकली पुलावर शेतकऱ्यांचे आंदोलन
सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे. या महामार्गाला शेतकऱयांचा विरोध आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी कृषी दिनादिवशीच भरपावसात अंकली (ता. मिरज) येथे सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला. या आंदोलनामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजुने वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. शासनाने जबरदस्तीने महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई करू, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी यावेळी दिला.
सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी शेतजमिनीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. वास्तविक हा महामार्गाला शेतकर्यांचा विरोध आहे. तरी देखील शासनाने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. अनेक ठिकाणी मोजणी देखील बंद पाडल्या आहेत. पण शासन पोलीस बंदोबस्तात मोजणी करत आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी व महामार्ग हा कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज अंकली येथे सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला. ‘शेती आमच्या हक्काची नाही, नाही कुणाच्या बापाची’, ‘या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय’, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी खासदार विशाल पाटील, शेतकरी संघटनेचे महेश खराडे, प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, शुभगिनी शिंदे, लता कांबळे, बाळासाहेब पाटील, यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
सहा जणांना अटक अन् सुटका
– या आंदोलनामुळे सांगली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपअधीक्षक विमला एम. यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक किरण चौगले, शहरचे निरीक्षक संजय मोरे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या पथकासह राखीव दल, जलद कृती दलाचे पथक तैनात होते. दरम्यान, आंदोलनादरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले शांतीनाथ लिंबेकाई यांना अटक केली, त्यानंतर काहीवेळाने त्यांची सुटका करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List