अहिल्यानगर जिल्ह्यात 43 टक्के पेरणी, नेवाशात सर्वाधिक; तर कोपरगावात कमी पेरा
अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग आला असून, आतापर्यंत दोन लाख 98 हजार 128 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. सरासरी 43 टक्के पेरा झाला आहे. नेवासा तालुक्यात सर्वाधिक 78.72 टक्के पेरणी झाली आहे. सर्वांत कमी 4.55 टक्के पेरणी कोपरगाव तालुक्यात झाली आहे. पेरणीक्षेत्रावर कापूस, सोयाबीन आणि उडदाचा पेरा सर्वाधिक झाला आहे. पेरणी समाधानकारक असली, तरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे निम्म्या तालुक्यात खरीप पेरणीची मशागत रखडली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात 52 टक्के पाऊस कमी झाला. त्यामुळे मशागतीला वेळ मिळाला. खरीप पेरणीस प्रारंभ झाला. कृषी विभागाच्या 24 जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सात लाख 16 हजार 209 हेक्टरपैकी दोन लाख 98 हजार 128 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यामध्ये बाजरी 29 टक्के, मका 43, तूर 43.43, मूग 56, भुईमूग 8.45 टक्के पेरणीचा समावेश आहे.
तालुकानिहाय पेरणी अहवालात कोपरगाव तालुक्यात सर्वांत कमी 4.55 हेक्टर, संगमनेर तालुक्यात 12.62, अकोले तालुक्यात 15.72, शेवगाव तालुक्यात 25.64 टक्के, तर पाथर्डी तालुक्यात 38 टक्के पेरणी झाली. उर्वरित तालुक्यांत सरासरी 45 टक्क्यांच्या आसपास पेरणी झालेली आहे.
नेवाशात कापूस, तर जामखेडमध्ये सोयाबीन सर्वाधिक
n अहिल्यानगर जिल्ह्यात कापसाची 46.61 टक्के म्हणजे 72 हजार 391 हेक्टरवर पेरणी झाली. यामध्ये नेवासा तालुक्यात सर्वाधिक 23439 हेक्टर, शेवगावात 16350, तर राहुरी 11527 हेक्टर पेरणीचा समावेश आहे. सोयाबीनचा पेरा 36 टक्के म्हणजे 63 हजार 637 हेक्टरवर झाला. सर्वाधिक 18 हजार 373 हेक्टर जामखेड तालुक्यात, 11 हजार 890 राहाता, तर 9436 हेक्टर पारनेर तालुक्यातील पेरणीचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List