एलॉन मस्क – डोनाल्ड ट्रम्प वाद शिगेला; ट्रम्प यांची DOGE ची चौकशी करण्याची धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. त्यातच ट्रम्प यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी वन बिग, ब्युटीफुल बिलावर सिनेटमध्ये मतदान सुरू आहे. या विधेयकाबाबत गेल्या काही तासांपासून मॅरेथॉन मतदान सुरू आहे. एलॉन मस्क या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण आता ट्रम्प यांनी मस्कवर जोरदार निशाणा साधला आहे.
ट्रम्प म्हणाले की, राष्ट्रपती होण्यापूर्वीच मस्क यांना माहित होते की मी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांच्या विरोधात आहे. इलेक्ट्रिक कारचा विचार केला तर ते ठीक आहे पण प्रत्येकाला त्या खरेदी करण्यास भाग पाडता येत नाही. मस्कला कदाचित मानवी इतिहासात कोणापेक्षाही जास्त अनुदान मिळू शकते, परंतु अनुदानाशिवाय त्यांना कदाचित त्यांचे दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेत परतावे लागेल. इतके रॉकेट लाँचर, उपग्रह किंवा इलेक्ट्रिक कार तयार होणार नाहीत आणि आपण अशा प्रकारे खूप पैसे वाचवू, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. DOGE ने कदाचित मस्कला मिळालेल्या सरकारी सबसिडी आणि करारांची चौकशी करावी आणि त्यात कपात करावी. खूप पैसे वाचतील, असे सांगत त्यांनी DOGE च्या चौकशीची धमकीच दिली आहे.
एलॉन मस्क हे ट्रम्प यांच्या वन बिग, ब्युटीफुल बिलाचे कट्टर विरोधक आहेत. ते म्हणतात की या बिलामुळे राष्ट्रीय कर्ज प्रचंड वाढेल आणि ते 2.4 ट्रिलियन डॉलर्सवरून पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकते. ते म्हणतात की यामुळे बजेट तूट वाढेल. हे बिल अमेरिकन नागरिकांवर अतिरिक्त भार वाढवेल. त्यांनी ते हास्यास्पद आणि अत्यंत महागडे असल्याचे म्हटले आहे. या विधेयकात इलेक्ट्रिक वाहन कर क्रेडिट आणि स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहने रद्द करण्याची तरतूद आहे, जी मस्कच्या कंपनी टेस्लासाठी घातक ठरू शकते.
एलॉन मस्क मूळचे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग आफ्रिकेत घालवला. ते 1989 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतून कॅनडाला गेले आणि नंतर कॅनडाहून अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांनी अमेरिकेतच आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. मात्र, ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर ते चांगलेच अडचणीत आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List