शेतकऱ्यांना नुकसानीचे 13 हजार कोटी रुपये कधी देणार? अंबादास दानवे यांचा सवाल
शेतकऱ्यांना नुकसानीचे 13 हजार कोटी रुपये कधी देणार? असा सवाल आज विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. विधानपरिषदेत बोलताना ते म्हणाले आहेत की, “मे आणि जून महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात 77 हजार 300 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसात 162 लोक मृत्यूमुखी पडले असून 230 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मे आणि जून महिन्याच्या नुकसानीची माहिती दिली असली तरीही शेतकऱ्यांना मागील काही काळात झालेल्या नुकसानीचे 13 हजार 819 कोटी रुपये देणे बाकी आहे.”
“मे आणि जून महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहे का? अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली का? तसेच राज्य सरकारने या नुकसानीचा कालबद्ध कार्यक्रम आखला आहे का?”, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
… सर्व शेतकऱ्यांना त्याची शिक्षा
यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना बंद केली असून पूर्वी पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देताना 4 ट्रिगर पद्धतीने दिला जात होता. मात्र सरकारने यामध्ये बदल करून 3 ट्रिगर रद्द करण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. मिड सीजन, स्थानिक आपत्ती आणि पोस्ट हार्वेस्ट हे तीन ट्रिगर रद्द करून फक्त उंबरठा उत्पादन हे ट्रिगर ठेवले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पीक विमा योजनेत अनागोंदी झाली म्हणून सर्व शेतकऱ्यांना त्याची शिक्षा देणे योग्य नाही. राज्य सरकारने हे तीन ट्रिगर का बंद केले आणि आगामी काळात हे तीन ट्रिगर पुन्हा सुरु करणार का? असा प्रश्न आज विधान परिषद सभागृहात त्यांनी उपस्थित केला. तसेच आज पेरलं तर उद्या पीक येईल याचा, भरवसा राहिला नाही. त्यामुळे मधले टप्पे राहिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
16 हजार पदाची भरती करण्यासाठी वित्त खात्याला निर्देश देणार का?
अंबादास दानवे म्हणाले की, “कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी जलसंधारण खाते अत्यंत महत्त्वाचे आहे. अशात मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झालेली आपण पाहिलेली आहे. जलसंधारण खात्याच्या मार्फत चांगले काम केले तर भूजल पातळी वाढण्यासाठी मदत होऊन दुष्काळावर मात होऊ शकते. तसेच या खात्याच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सुद्धा कार्य करता येऊ शकते. त्यामुळे कृषी उत्पन्न वाढविणे, भुजल पातळी वाढविणे आणि पर्यावरण संतुलन राखणे हे काम करता येऊ शकते. त्यामुळे या खात्यांतर्गत प्रभावीपणे काम करण्यासाठी याकडे दुर्लक्ष राहता कामा नये. या खात्यातील 16 हजार पदाची भरती करण्यासाठी वित्त खात्याला निर्देश देणार का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List