बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी SIT चौकशी; मुख्यमंत्र्यांची माहिती
बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरण गंभीर आहे. याची व्याप्ती आणि गंभीरता लक्षात घेच सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून दोषींना पाठीशी घालणाऱ्या सर्वांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या प्रकरणातील सर्व मुलींना न्याय देण्यात येईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
क्लासेसच्या नावाखाली बाजार मांडणार्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिकणार्या सतरा वर्षीय मुलीने नराधम शिक्षकांचा भंडाफोड केला आहे. वर्षभरापासून कॅबिनमध्ये बोलावून छेडछाड करत असल्याची तक्रार तिने दाखल केली. यानंतर मुलीवर अत्याचार करणारे दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. या प्रकारामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. उमाकिरण शैक्षणिक संकुलाला टाळे ठोकण्यात आले आहे. क्लासेस काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. एकीकडे लाखो रुपये कमवणारे क्लासेसवाले शिक्षक कसे अनैतिक वागत आहेत याचा प्रत्यय बीडमध्ये आला आहे.
ही घटना 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 या कालावधीत घडली. प्रशांत खटावकर आणि विजय पवार हे दोघेही पीडितेला वारंवार क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलवत असत. यावेळी पीडितेशी जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे. या प्रकारामुळे पीडिता मानसिक तणावाखाली गेली. पालकांनी विचारल्यावर तिने आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवारी रात्री दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता मुलगी केबिनमध्ये आल्यावर तिच्या अंगाशी लगट केली. तिला अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर तिचे नग्न फोटो मोबाईलमध्ये क्लिक केले. हे सर्व पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List